सोलापूर : दुष्काळामुळे (drought) झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी आज केंद्रीय पथक सोलापूर (Solapur) जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले होते. यावेळी, करमाळा तालुक्याच्या घोटी, वरकुटे, नेरले व सालसे या गावातील नुकसानीची पथकाने पाहणी केली. यावेळी आपल्या व्यथा मांडतांना अनेक शेतकऱ्यांच्या डोळ्यातून पाणी आल्याचे पाहायला मिळाले. तर, दुष्काळी परिस्थितीची दाहकता व त्यामुळे झालेले शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान याची दखल घेऊन शासनाने शेतकऱ्यांना तत्काळ मदत जाहीर करावी, अशी मागणी सर्व ठिकाणी शेतकऱ्यांकडून करण्यात येत होती. (Central Team Inspection of Drought Affected Villages)
यावर्षी सोलापूर जिल्ह्यात कमी पाऊस झाल्याने राज्य शासनाने माळशिरस, बार्शी, सांगोला, माढा व करमाळा या पाच तालुक्यात तर जिल्ह्याच्या उर्वरित तालुक्यातील 45 महसूल मंडळात दुष्काळ जाहीर केलेला आहे. केंद्र शासनाकडून ही दुष्काळी परिस्थितीच्या अनुषंगाने शेतकऱ्यांना मदत देण्यात येते. त्याच पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थितीची पाहणी करण्यासाठी दोन सदस्य केंद्रीय पाहणी पथक सोलापूर जिल्हा दौऱ्यावर आलेले असून, पथकाने आज करमाळा तालुक्यातील घोटी, वरकुटे, नेरले व सालसे या गावातील दुष्काळी स्थितीची पाहणी केली व शेतकऱ्यांची संवाद साधला.
शेतकऱ्यांच्या डोळ्यातून अश्रू
या दुष्काळ पाहणी पथकात केंद्र शासनाच्या पाणी पुरवठा व स्वच्छता विभागाचे अतिरिक्त सल्लागार ए. मुरलीधरण व केंद्रीय अन्न व सार्वजनिक वितरण विभागाच्या उपसचिव श्रीमती सरोजिनी रावत यांनी करमाळा तालुक्यातील घोटी, वरकुटे, नेरले व सालसे गावातील शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन रब्बी पिकांची पाहणी केली. तसेच शेतकऱ्यांशी संवाद साधत असताना खरीप पिकाच्या नुकसानीचीही माहिती त्यांनी जाणून घेतली. दुष्काळ पाहणी पथकातील सदस्यांशी संवाद साधत असताना अनेक शेतकऱ्यांच्या डोळ्यातून अश्रू वाहत होते.
पाझर तलावाची प्रत्यक्ष पाहणी केली
केंद्रीय पथकाने बुधवारी माळशिरस व सांगोला तालुक्यातील दुष्काळग्रस्त गावांना भेटी देऊन तेथील दुष्काळाच्या तीव्रतेची तसेच नुकसान झालेल्या तूर, मका, ज्वारी, डाळिंब पिकांची पाहणी केली. शेतकऱ्यांच्या शेतातील सिंचन विहिरी तसेच शासनाच्या जलसंपदा विभागाकडील पाझर तलावाची ही प्रत्यक्ष पाहणी केली व या भागातील पाण्याची व चाऱ्याची सद्य परिस्थिती व शेतकऱ्यांच्या पिकांच्या झालेल्या नुकसानीची ही माहिती त्यांनी जाणून घेतली. केंद्रीय पथकाच्या या दोन दिवसाच्या दौऱ्यात प्रभारी जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी राजकुमार मोरे यांनी जिल्ह्यातील टंचाईच्या परिस्थितीची तसेच यामुळे झालेल्या खरीप व रब्बी पिकाच्या नुकसानीची माहिती दिली.
केंद्रीय पथकाचा दोन दिवसाचा दौरा
जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थितीची पाहणी करण्यासाठी आलेल्या केंद्रीय पथकाने बुधवार 13 डिसेंबर रोजी माळशिरस तालुक्यातील सुळेवाडी व शिंगोर्णी तर सांगोला तालुक्यातील आचकदाणी, महूद बुद्रुक या गावातील दुष्काळी परिस्थितीची पाहणी केली. तर 14 डिसेंबर रोजी करमाळा तालुक्यातील घोटी, वरकुटे, सालसे व नेरले या गावातील दुष्काळी परिस्थितीची पाहणी करून शेतकऱ्यांशी संवाद साधून त्यांच्या व्यथा जाणून घेतल्या. केंद्रीय पथकाकडून या पाहणीचा अहवाल केंद्र शासनाला सादर झाल्यानंतर त्या अहवालानुसार केंद्र शासन आपली मदत जाहीर करू शकते.
इतर महत्वाच्या बातम्या:
केंद्रीय पथकाकडून आजपासून मराठवाडा, उ.महाराष्ट्राचा दौरा; दुष्काळाची करणार पाहणी