Ashadhi Wari 2022 : पंढरपूर येथे 30 जून ते 13 जुलै 2022 या कालावधीत आषाढी (Ashadhi Wari) यात्रा भरत आहे. यात्रेच्या पार्श्वभूमीवर कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी जिल्ह्यात नव्याने राहण्यास येणाऱ्यांची माहिती पोलिसांना देण्याचे आवाहन अपर जिल्हादंडाधिकारी शमा पवार यांनी केले आहे. पंढरपुरात आषाढी यात्रेच्या निमित्ताने मोठी गर्दी होते. त्यामुळे यात्रा काळात कोणताही अनूचित प्रकार घडू  नये यासाठी प्रशासनाने हा निर्णय घेतला आहे. 


पंढरपूरचे विठ्ठल रुक्मिणी मंदीर हे वारकरी संप्रदायातील तसेच इतर भाविकांचे आणि संपूर्ण महाराष्ट्राचे आराध्यदैवत असल्यामुळे आषाढी वारीला संपूर्ण महाराष्ट्रातून व इतर प्रांतातून भाविक मोठ्या प्रमाणात पंढरपुरात येत असतात. महाराष्ट्रातील सर्वात मोठी व भारतामध्ये कुंभमेळ्यानंतर एक महत्वपूर्ण यात्रा म्हणून आषाढी यात्रेला अत्यंत महत्व आहे. आषाढी यात्रेला 12 ते 14 लाख भाविक पंढरपूरला येत असतात. या धार्मिकदृष्ट्या अत्यंत महत्वाच्या व मोठ्या यात्रेत एखादी अनुचित घटना घडू नये, जिल्ह्यात नव्याने राहण्यासाठी कोण आले तर त्याची माहिती पोलिसांना देण्यात यावी असे आवाहन करण्यात आले आहे. 


"जिल्ह्यात नवीन राहण्यासाठी येणाऱ्यांची माहिती असणे अत्यंत गरजेचे आहे. त्यामुळे सोलापूर जिल्ह्यामध्ये आपल्या हद्दीत जी-जी व्यक्ती नव्याने राहण्यास येईल त्या व्यक्तीस व जे कोणी अशा व्यक्तीस राहण्यास जागा उपलब्ध करुन देईल असे घरमालक, प्रॉपर्टी डिलर, ब्रोकर, एजेंट, मस्जिद, चर्च, धर्मशाळा इत्यादीचे विश्वस्त यांना अशा अनोळखी नवीन रहावयास आलेल्या व्यक्तींची त्यांच्या वास्तव्यासंबंधीची संपूर्ण माहिती जवळच्या पोलीस ठाण्यात देणे गरजेचे आहे, असे जिल्हा प्रशानाने म्हटले आहे. 


आषाढीवारी कालावधीत फ्लॅट, लॉज, मठ, धर्मशाळा, चर्च, मशिद, मंदिर व खासगी निवासस्थाने याठिकाणी अनोळखी अथवा संशयित व्यक्तींना ओळख पटवल्याशिवाय राहण्यास परवानगी देवू नये. भाडेकरुकडून रहिवाशी व ओळख असलेल्या पुराव्याच्या छायांकित प्रती घ्याव्यात. आषाढी वारी कालावधीत स्फोटक पदार्थ, बार उडणारे पदार्थ सोबत बाळगू नये. तसेच गॅस, केरोसीन, डिझेल, पेट्रोल याचा वापर अत्यंत काळजीपूर्वक करुन सुरक्षित ठिकाणी ठेवावीत, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.