Ashadhi Wari 2022 : यंदा दोन वर्षानंतर होत असलेल्या आषाढी एकादशी (Ashadhi Wari) सोहळ्याला प्रथमच तुळशी वृंदावनामधील 8 प्रकारच्या तुळशीचा हार विठुरायाच्या गळ्यात घालण्यात येणार आहे. ही माहिती मंदिर समितीसह अध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी दिली आहे. 


देवेंद्र फडणवीस सरकारच्या काळात तत्कालीन वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या प्रयत्नातून वनविभागानं 8 कोटी रुपये खर्च करुन वारकरी भाविकांसाठी अफलातून तुळशी वृंदावन साकारलं होतं. येथे वारकरी संतांच्या मूर्ती आणि त्याचा इतिहास रेखाटला आहे. देशात आढळणाऱ्या तुळशीच्या सर्व प्रकारची झाडं जोपासण्याचा प्रयत्न वन विभागानं केला आहे. पंढरपूरला येणाऱ्या भाविकांचं हे आकर्षणाचं केंद्र असून दरवर्षी हजारो भाविक येथे भेट देत असतात. 


बी बाग वन विभागानं मंदिर समितीला हस्तांतरित करावी, अशी मागणी समितीनं पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) यांच्याकडे केली आहे. यावर आदित्य ठाकरे यांनी सकारात्मक भूमिका घेतली होती. यावेळी आषाढी महापूजेसाठी आल्यावर पुन्हा एकदा ही मागणी केली जाणार असून आदित्य ठाकरे हे तुळशी वृंदावन लाखो भाविकांसाठी मंदिर समितीस देतील, असा विश्वास औसेकर यांनी व्यक्त केला आहे. 


आषाढी यात्रेपूर्वी विठ्ठल भक्तांच्या खिशाला कात्री, लाडू प्रसाद दीडपट महागला


आषाढी यात्रेपूर्वीच विठ्ठल भक्तांचे तोंड कडू करणारी बातमी आहे. नाही नाही म्हणत अखेर मंदिर समितीने नवीन टेंडरमध्ये विठुरायाच्या लाडू प्रसादात तब्बल दीडपटीने वाढ केल्याने गोरगरीब भाविकांच्या खिशाला आता कात्री लागणार आहे. गेल्या सहा महिन्यापासून मंदिर समितीच्या भोंगळ कारभारामुळे आधी भाविकांना लाडू प्रसाद मिळालेला नाही. यानंतर नवीन टेंडरनुसार लाडूचे दर जवळपास दीडपट वाढवल्याने याचा फटका सर्वसामान्य भाविकांना बसणार आहे. मंदिर समितीने लाडू बनवण्यासाठी ठेका देताच लाडूच्या किमतीत दीडपट वाढ झाल्याचं मंदिर समितीच्या सहअध्यक्षांनी सांगितल्याने भाविकांच्या खिशाला कात्री लागणार आहे. 


महत्त्वाच्या इतर बातम्या :