Nivruttinath Maharaj Palkhi : दादा, देवाचं काम हाये, जीव हाये तोवर, नाथांचा रथ सजवणारच' असे भावनिक करणार शब्द आहेत, कैलास माळी यांचे. आज त्र्यंबकेश्वर येथून संत निवृत्तीनाथांचा पालखी सोहळा पंढरपूरकडे प्रस्थान होत आहे. या अभूतपूर्व सोहळ्यात निवृत्तीनाथांना आपल्या विठ्ठलाची भेट घडते ती याच रथामुळे. 


करोनाच्या संकटामुळे आषाढीच्या पायी वारीला खंड पडलेला होता. मात्र मोजक्या वारकऱ्यांमध्ये परंपरा कायम राखली गेली. पण आता करोना आवाक्यात आलाय, म्हणूनच लाडक्या विठुरायाची भेट घेण्यासाठी वारकऱ्यांना पंढरपूरची आस लागली आहे. अशातच संत निवृत्तीनाथ रथाचे सारथ्य करणारे त्र्यंबकेश्वर कैलास माळी हे गेल्या अनेक वर्षांपासून रथ पालखी सोहळा अनुभवत आहेत. 


संत निवृत्तीनाथांच्या पालखीसाठी माळी हे गेल्या अनेक वर्षांपासून अविरत सेवा करीत आहेत. मूळचे त्र्यंबकेश्वर येथीलच असल्याने पिढ्यानपिढ्या हा वारसा ते जपत आहेत. ते गेल्या एक दीड महिन्यापासून दिंडी पालखी रथाला झळाळी देण्याचे काम करत आहेत. तीन ते चार दिवसांपूर्वी त्यांनी मंदिर परिसरातील वर्कशॉपमध्ये हा रथ सज्ज केला आणि आज पालखी सोहळ्यात सारथ्य केले.  


दोन वर्षांपासून वारी न झाल्याने रथाची डागडुजी झाली नव्हती


कैलास माळी म्हणाले, दोन वर्षांपासून वारी न झाल्याने रथाची डागडुजी झाली नव्हती. यामुळे मोठ्या प्रमाणात धूळ व काळपटपणा रथाला आलेला होता. तो काढण्यासाठी रथाचे संपूर्ण क्लिनिंग करण्यात आले असल्याचे त्यांनी सांगितले. त्यावर लेअर कोटिंगची झळाळी देण्यात आली आहे. यामुळे चांदीच्या रथाच्या झळाळीत अजूनच भर पडली असून रथ चकाकून निघाला आहे. विधिवत पूजा झाल्यानंतर रथ वारीसाठी सज्ज करण्यात आला.


25 वर्षांची परंपरा
आमच्या वडीलांपासून हा रथ सजविण्याचे आणि तयार करण्याचे काम आम्ही गेली 25 वर्ष करीत आहोत. हा रथ हा जर्मन सिल्वरमध्ये बनविण्यात आला आहे. पालखी सोहळ्यानंतर सुमारे 11 महिने रथ एकाच जागेवर असल्याने त्यास काळपट रंग आला होता. त्यास बफिंग करून झळाळी देण्यात आल्याचे माळी यांनी सांगितले. 


'जीव हाये तोवर...'
कैलास माळी म्हणाले, आमचं माळी कुटुंब हे गेली अनेक वर्षांपासून नाथांची सेवा करतो आहे. त्यामुळे जीव हाये तोवर रथही सजवणार आणि तयार करणार. त्याच्यात काय आनंद आहे, जो कशातही नाही. माझ्या वडिलांनी माझ्याकडे वारसा दिला. यापुढं हा वारसा माझा मुलगा नक्कीच चालवेल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.