Ashadhi Wari 2022 Nivruttinath Maharaj Palkhi : विठ्ठला, सगळीकडे सुख येऊ दे रे बा, अशी आळवणी करीत त्र्यंबकेश्वरातून हजारो भाविक आज पालखी सोहळ्यात दाखल झाले असून थोड्याच वेळात संत निवृत्तीनाथ पालखी सोहळ्याचे प्रस्थान पंढरपूरकडे मोठ्या उत्साहात होत आहे. संतश्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराज पायी दिंडी आषाढी वारीसाठी पंढरपूरकडे प्रस्थान करणार आहे.
तब्बल दोन वर्षांच्या व्यत्ययानंतर संतश्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराज यांची पायी दिंडी आज (13 जून) आषाढी वारीसाठी पंढरपूरकडे प्रस्थान करणार आहे. या दिंडी सोहळ्यात महाराष्ट्रभरातून ठिकठिकाणाहून 46 दिंड्या सहभागी झाल्या असून यंदाची वारी निर्बंधमुक्त असल्यामुळे भाविकांमध्येही उत्साहाचे वातावरण पाहायला मिळत आहे.
हजारो भाविकांमध्ये उत्साह
कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता गेली दोन वर्ष पायी वारीवर शासनाने निर्बंध घातल्याने यंदा मात्र मोठा उत्साह वारकऱ्यांमध्ये आहे. जवळपास ४६ दिंड्या संत निवृत्तीनाथ पालखीत सहभागी होणार असून वारकऱ्यांचा उत्साह द्विगुणित झाला आहे.
यंदाही एकेरी वाहतूक
संत निवृत्तीनाथ मंदिरचे प्रशासक राम लिपटे म्हणाले की यंदाही वारीसाठी एकेरी वाहतुकीचे नियोजन आहे. दरवर्षी वारीत अनेकदा अपघाताच्या घटना निदर्शनास येतात. त्या पार्श्वभूमीवर यंदा एकेरी वाहतुकीचे नियोजन आहे. जेणेकरून दिंडीतील वारकऱ्यांना कोणतीही इजा नको. वारी सुखकर होणे महत्त्वाचे, असे ते म्हणाले.
पोलीस कुमक तैनात
दरम्यान यंदा दिंडी सोहळ्यात हजारो भाविक दाखल झाल्याने पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. यामध्ये तीनशे हुन अधिक ग्रामीण पोलिसांची कुमक वाढविण्यात आली आहे. यामध्ये 200 होमगार्ड, 15 वरिष्ठ अधिकारी, 70 पोलीस कर्मचारी तैनात आहेत.
इतर सुविधा
दरम्यान हजारो वारकरी आले असल्याने वैद्यकीय सुविधेसह पिण्याची पाण्याची व्यवस्था, वारकऱ्यांना मार्गदर्शनासाठी सेवेकरी नेमण्यात आले आहेत. तसेच संत निवृत्तीनाथ दिंडीतील सहभागी दिंड्याना दिंडी फलकही देण्यात आले आहेत.