Maharashtra Solapur Crime News: पंढरपुरात (Pandharpur) घडलेल्या एका धक्कादायक घटनेनं संपूर्ण जिल्हा हादरला आहे. एरव्ही विठ्ठलाच्या नामघोषात बुडालेल्या या शहराला गालबोट लागणारी घटना घडली आहे. आपलं लग्न जमवत नसल्यानं एका मुलानं स्वतःच्या जन्मदात्या पित्याच्या डोक्यात फरशी घालून त्यांची हत्या केली आहे. पंढरपूर शहरात घडलेल्या धक्कादायक घटनेनं संपूर्ण सोलापूर जिल्ह्यात खळबळ माजली आहे.
वडील लग्न जमवत नसल्यानं संतापलेल्या मुलानं थेट पित्याच्या डोक्यात फरशी घालून त्यांची हत्या केली. ही धक्कादायक प्रकार पंढरपूर शहरात समोर आली आहे. मुलानं रागाच्या भरात पित्याच्या डोक्यात फरशी घातली. या घटनेत वडील गंभीर जखमी झाले. त्यानंतर मुलानंच वडिलांना रुग्णालयात दाखल केलं. मात्र या घटनेत गंभीर जखमी झालेल्या वडिलांचा उपचारा दरम्यान सोमवारी रात्री साडेसातच्या सुमारास मृत्यू झाला. दुर्दैवानं यात मृत्यू झालेले वडील हे दोन्ही पायानी अपंग होते.
यातील गोपिचंद उर्फ जितू हुकुम कदम (वय 28, रा. भगवान नगर, पंढरपूर) हा मुलगा आपले अपंग वडील हुकुम माणीक कदम (वय 58) यांच्याकडे गेल्या काही दिवसांपासून लग्नासाठी हट्ट करत होता. माझं लग्न करून द्या, असं म्हणत तो कित्येक दिवसांपासून मागे लागला होता.
नेमकं काय घडलं?
वास्तविक कदम कुटुंब अत्यंत गरीब असून यांचा मोठा मुलगा कापड दुकानात काम करतो, तर आरोपीची आई धुणंभांड्याची कामं करते. हत्या केलेला गोपीचंद हा बेरोजगार होता. शिक्षण देखील न झाल्यानं त्यानं काही दिवसांपूर्वी एक वेल्डिंगचं दुकान काढलं होतं. मात्र याही ठिकाणी तो काम करत नसल्यानं त्याचे कुटुंबीय हैराण झाले होते. यातच अपंगत्वामुळे घरीच असणाऱ्या वडिलांच्या मागे या धाकट्या मुलानं लग्नाचा तकादा लावला होता. वडिलांनी यास विरोध केल्यानं संतप्त झालेल्या गोपीचंद यानं रविवारी रात्री सव्वा नऊच्या सुमारास वडील हुकुम कदम यांना "तू माझं लग्न करत नाही, तुला आता ठेवत नाही", असं म्हणून शिवागाळ केली. त्याचबरोबर त्यानं हुकूम यांना जिवे मारण्याच्या उद्देशानं घरासमोर पडलेला फरशीचा तुकडा आणि लाकडी फळीच्या तुकड्यानं तोंडावर जोरानं मारहाण केली. या मारहाणीत हुकुम गंभीर जखमी झाले. त्यांना उपचारासाठी तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. मात्र त्यांची प्रकृती अधिक चिंताजनक झाली होती. यातच उपचारादरम्यान वडील हुकूम कदम यांचा मृत्यू झाला. ही घटना समजताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत, जखमी हुकूम कदम यांना रुग्णालयात दाखल केलं होतं. दरम्यान, या प्रकरणात मुलाच्या विरोधात खुनाचा गुन्हा दाखल झाला असून पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रकाश भुजबळ करीत आहेत.