सोलापूर: 'दीन-दलितांचा आवाज काँग्रेस पक्ष आहे, बाकी लोक निवडणुकीपुरतं येतात आणि जातात, त्यामुळे रक्तापेक्षा विश्वासाचे नाते महत्त्वाचे आहे अशा शब्दात काँग्रेसच्या प्रदेश कार्याध्यक्षा आणि सोलापूरच्या आमदार प्रणिती शिंदे (Praniti Shinde) यांनी वंचित बहुजन आघाडीचे सर्वेसर्वा प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांचे नाव न घेता निशाणा साधला. तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर देखील प्रणिती शिंदे यांनी जोरदार टीका केली.


अनेक कामं प्रलंबित, मग निधी कशासाठी ठेवलाय? 


सोलापुरात मातंग एकता आंदोलन आणि शहर उत्तर युवक काँग्रेसच्या वतीने लोकशाहीर अण्णाभाऊ साठे गौरव पुरस्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात मागसवर्गीय समाजातील समस्याबाबतीत आमदार प्रणिती शिंदे बोलतं होत्या. "सध्या संजय गांधी निराधार योजना आणि श्रावण बाळ योजना या दोनच योजना सुरू आहेत. रमाई आवास योजनेत मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार आहे. काही दिवसांपूर्वी रमाई आवास योजनेची आढावा बैठक झाली. रमाई योजनेसाठी महापालिकेतून मागील 5 वर्षात आम्हाला कोणतीही मागणी आली नाही अशी माहिती समाज कल्याण अधिकाऱ्यांनी सांगितले. तसेच योजनेसाठी 500 पेक्षा अधिक प्रस्ताव प्रलंबित आहे. प्रकरण मंजूर करत नाही आणि निधी शिल्लक पडलेला आहे. मागणी नाही मग तुम्ही काय करताय हा निधी तुम्ही कशासाठी ठेवला आहे? मग वर्षभर निधी ठेवायचा आणि नंतर तो वळवायचा असे काम आहे का?" अशी टीका आमदार प्रणिती शिंदे यांनी यावेळी केली.


प्रकाश आंबेडकरांवर नाव न घेता टीका 


पुढे बोलताना आमदार प्रणिती शिंदे यांनी प्रकाश आंबेडकर यांचे नाव न घेता टीका केली. "दीनदलितांचा आवाज हा केवळ काँग्रेस पक्ष आहे. बाकी निवडणुकीपुरता येतात आणि जातात. त्यामुळे मला असे वाटते की रक्ताच्या नात्यापेक्षा विश्वासाचं नातं ही जास्त खंबीर आणि महत्वाचं असतं. ते टिकवणे देखील जास्त महत्त्वाचं आहे. आम्ही तुमच्यासोबत खंबीरपणे उभे आहोत." 




पंतप्रधान नरेंद्र मोदींवरही टीका 


दरम्यान, आमदार प्रणिती शिंदे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर देखील टीका केली. "मागासवर्गीयांना जेव्हा न्याय मिळतो त्यावेळेस लोकशाही खंबीर होत असते. मात्र आज उलट होताना दिसत आहे. लोकशाहीत दीनदलितांचा आवाज दाबला जातोय. त्यामुळे लोकशाहीची हत्या होते की काय असा प्रश्न मला पडतो आणि परम आदरणीय मोदीजी ते करतच आहेत. विरोधकांना बोलू न देणे, दीनदलितांवर होणाऱ्या अत्याचारावर न बोलता त्याचे समर्थन करत आहेत. मणिपूर जळत आहे मात्र त्याबाबत काहीही बोलले नाहीत. मात्र ज्यावेळेस चंद्रयान लँड झाले, ज्याचे श्रेय शास्त्रज्ञांना जाते. परंतु चंद्रयान लँड होत असताना मोदीजी अचानक मधे येतात. बिचारे कष्ट करणारे शास्त्रज्ञ बॅक ड्रॉपला गेले. मोदीजींचे चंद्रयानाशी काय देणे घेणे आहे तुम्हाला प्रसिद्धी हवी असेल तर घ्या. मात्र आमच्या बांधवांना न्याय द्या." अशा शब्दात आमदार प्रणिती शिंदे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका केली. 


प्रणिती शिंदेची वाटचाल खासदारकीकडे?


काँग्रेस आमदार प्रणिती शिंदे यांची वाटचाल खासदारकीकडे सुरू असल्याची चर्चा मागील काही दिवसांपासून सोलापुरात सुरू आहे. काँग्रेस कार्यकर्त्यांकडून सोलापूर लोकसभा निवडणुकीत आमदार प्रणिती शिंदे यांना तिकीट देण्यात यावे, अशी मागणी जोर धरू लागली आहे. सोलापुरातील काँग्रेस भवन समोर लागलेल्या बॅनरवर प्रणिती शिंदे यांचा उल्लेख 'भावी खासदार' असा करण्यात आला आहे. 2019 च्या लोकसभा निवडणुकीत सुशीलकुमार शिंदे यांच्याविरोधात भाजपचे डॉ. जयसिद्धेश्वर शिवाचार्य यांच्यासह वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर हेही रिंगणात होते. या निवडणुकीत सुशीलकुमार शिंदे यांचा एक लाख 58 हजार मतांनी पराभव झाला होता. मात्र त्याच वेळी प्रकाश आंबेडकर यांना एक लाख 70 हजार मते मिळाली होती. प्रकाश आंबेडकर यांच्या उमेदवारीचा सुशीलकुमार शिंदे यांना फटका बसल्याचा बोलले जाते. त्यामुळे मातंग समाजाच्या वतीने आयोजित कार्यक्रमात बोलताना प्रकाश आंबेडकर यांच्यावर आमदार प्रणिती शिंदे यांनी टीका केली. तसेच मागासवर्गीय समाजाच्या आपण पाठीमागे खंबीरपणे उभे असल्याचे देखील वक्तव्य केले. 


ही बातमी वाचा: