Agriculture News : सध्या राज्यातील शेतकरी आभाळाकडे डोळे लावून बसले आहेत. कारण सर्वजण सध्या पावसाच्या (Rain) प्रतिक्षेत आहेत. अनेक ठिकाणी पाण्याअभावी शेतकऱ्यांची पिकं वाया जात आहेत. उन्हाचा चटका वाढत चालल्यानं उजनी धरणाच्या (Ujani dam) काठावर असणाऱ्या करमाळा (Karmala) तालुक्यातील शेतकऱ्यांना पिकं वाचवण्यासाठी धडपड करावी लागत आहे. धरण उशाशी कोरड आणि घशाशी अशी भीषण अवस्था निर्माण झाली आहे.
वाशिंबे परिसरात उजनीच्या पाण्याची पातळी तब्बल 50 फुटाने घटली
यंदा दुष्काळाची दाहकता वाढत चालली आहे. अशात शेतकरी सध्या पावसाच्या प्रतिक्षेत आहेत. मान्सून सध्या केरळमध्ये दाखल झाला आहे. मात्रा, अद्याप महाराष्ट्रात मान्सून दाखल झाला नाही. त्यामुळं शेतकरी चिंतेत आहे. पाण्याअभावी शेतकऱ्यांची पिकं करपू लागली आहेत. सध्या उजनी बॅक वॉटर परिसरातील वाशिंबे, कुगाव अशा अनेक गावातील शेतकऱ्यांची पिकं वाचवण्यासाठी धडपड असल्याचे पाहायला मिळत आहे. करमाळा तालुक्यातील वाशिंबे परिसरात उजनीच्या पाण्याची पातळी तब्बल 50 फुटाने घटल्याने शेतातील पिके जगवण्यासाठी शेतकऱ्यांना पाण्यापर्यंत 2 किलोमिटर पर्यंत चाऱ्या खणून पाणी न्यावे लागत आहे.
शेतकऱ्यांचा मोठा खर्च
चाऱ्या खणून नेण्यासाठी जवळपास दीड ते दोन कोटी खर्च आहे. त्यामुळं गावातील शेतकरी एकत्र येऊन प्रत्येकी दोन ते अडीच लाख रुपये जमा करुन या चाऱ्या तयार करून घेत आहेत . बॅक वॉटरचे पाणी या चाऱ्यातून आणून त्यात शेकडो मोटारी सुरू ठेवल्या आहेत. अजून पाणी पातळी कमी झाल्यावर पुन्हा चाऱ्याची लांबी वाढवत नेण्याशिवय पर्याय नसणार आहे. काही दिवसापूर्वी थेट शेतात असलेले पाणी यावर्षी पुन्हा इतके लांब गेले आहे की पिके जगवण्यासाठी धावाधाव करायची वेळ या शेतकऱ्यांवर येऊ लागली आहे.
राज्यात तापमानात वाढ
सध्या राज्यात तापमानात (Temperature) वाढ झाली आहे. नागरिकांना दुपारी उन्हाचा चटका सहन करावा लागत आहे. त्यामुळं सध्या नागरिक पावसाच्या (Rain) प्रतिक्षेत आहेत. सध्या घोषित झाली नसली तरी विदर्भ (Vidarbha) आणि कोकणात (Konkan) नकळत उष्णतेच्या लाटेसारखी जवळपास स्थिती आहे. १५ जूनपर्यंत अशीच स्थिती राहण्याची शक्यता ज्येष्ठ हवामान तज्ज्ञ माणिकराव खुळे यांनी व्यक्त केली आहे. त्यानंतर कदाचित वातावरणात काहीसा फरक जाणवू शकतो. कारण १६ जूनच्या आसपास मान्सून कदाचित गोव्यानंतर सिंधुदुर्ग जिल्ह्यात प्रवेश करण्याची शक्यता खुळे यांनी व्यक्त केली आहे.
महत्त्वाच्या बातम्या: