Solapur News : कांद्याचे निर्यात शुल्क (Onion Export Duty) वाढीविरोधात शेतकऱ्यांसह विविध शेतकरी संघटना (janhit shetkari sanghatana) आक्रमक झाल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये (Solapur Agricultural Produce Market Committee) कांद्याचे लिलाव बंद पाडण्यासाठी जनहित शेतकरी संघटना आज आंदोलन करणार आहे. जनहित शेतकरी संघटनेचे पदाधिकारी रात्रीपासूनच मार्केट कमिटीत थांबले आहेत. पहाटेपासूनच कांद्याच्या गाड्या थांबवण्यासाठी शेतकऱ्यांचे मनपरिवर्तन करण्याचा प्रयत्न केला जात आहे. दरम्यान, कांदा लिलाव बंद पाडू नयेत, तसेच आंदोलन होऊ नये यासाठी मार्केट यार्डबाहेर पोलिसांचा मोठा फौजफाटा दिसत आहे. 


पोलिस आणि जनहित शेतकरी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांमध्ये चर्चा


कांदा निर्यातीवर शुल्क आकारल्यानं जनहित शेतकरी संघटना आक्रमक झाली आहे. कांद्याचे निर्यात शुल्क कमी करावं या मागणीसाठी आज आंदोलन करण्यात येणार आहे. यासाठी आज कांदा लिलाव बंद पडण्याचा इशारा जनहित शेतकरी संघटनेनं दिला आहे. त्यामुळं सोलापूर बाजार समितीच्या परिसरात पोलिसांचा मोठा बंदोबस्त वाढवला आहे. 
दरम्यान पोलिस आणि जनहित शेतकरी संघटनेचे अध्यक्ष आणि पदाधिकाऱ्यांमध्ये मार्केट कमिटी कार्यालयात चर्चा सुरु आहे. 


कांदा उत्पादक शेतकऱ्यांसह व्यापारी आक्रमक


केंद्र सरकारने कांद्याच्या निर्यातवर तब्बल 40 टक्के शुल्क आकारण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळं राज्यातील कांदा उत्पादक शेतकरी आणि व्यापारी आक्रमक झाले आहेत. याचा मोठा फटका शेतकऱ्यांना बसणारआहे. सरकारच्या या निर्णयामुळे कांद्याच्या निर्यातीत घट होणार आहे. यामुळं पुढील काळात किरकोळ बाजारात कांद्याचे दर घटण्याची भीती व्यक्त होतेय. म्हणूनच केंद्र सरकारच्या या निर्णयाविरोधात आणि निषेधार्थ अनेक ठिकाणी बाजार समित्या बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मात्र, सोलापूर बाजार समितीत अद्यापही कांद्याचे लिलाव सुरुच आहेत. हे लिलाव बंद करण्यात यावेत या मागणीसाठी जनहित शेतकरी संघटना आज आंदोलन करणार आहे. 


लिलाव ठप्प असल्यानं आमचेच नुकसान, नाफेडकडून दिला जाणारा दर कमी : शेतकरी


नाशिक जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांपासून बाजार समित्यांमध्ये कांद्याचे लिलाव ठप्प असल्यानं जवळपास 45 कोटींचे नुकसान झाल्याचा अंदाज व्यक्त केला जातोय. विशेष म्हणजे यात आमचेच नुकसान होत असल्याची प्रतिक्रिया शेतकरी वर्गातून व्यक्त करण्यात येत आहे. अनेक शेतकरी ग्रामीण भागातून आपला माल घेऊन कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये दाखल होत आहेत. कांद्याचे लिलावही केले जात आहेत. मात्र, दर कमी मिळत असल्यानं शेतकरी नाराजी व्यक्त करत आहेत. नाफेडकडून दिला जाणारा दरही कमी असल्याचं नाशिकच्या कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आलेल्या शेतकऱ्यांनी एबीपी माझाशी बोलतांना म्हटलं आहे.


महत्त्वाच्या बातम्या: 


Onion News: कांद्याचा बफर स्टॉक केंद्रानं दोन लाख टनांनी वाढवला, 25 रुपये किलो दराने कांदा विकणार NCCF