मुंबई: राष्ट्रवादीचे माजी आमदार रमेश कदम यांची आठ वर्षांनंतर अखेर जामीनावर सुटका झाली आहे. अण्णा भाऊ साठी महामंडळ कथित घोटाळ्याप्रकरणी त्यांच्यावर गुन्हा नोंद करण्यात आला होता. आज न्यायालयाने त्यांना जामीन मंजूर केला. माजी आमदार रमेश कदम यांची आज ठाणे सेंट्रल जेलमधून सुटका करण्यात आली आहे. 


माजी आमदार रमेश कदम यांच्यावर अण्णा भाऊ साठे महामंडळामध्ये 312 कोटी रुपयांच्या घोटाळा केल्याचा आरोप ठेवण्यात आला आहे. त्या प्रकरणी त्यांच्यावर गुन्हा दाखल केल्यानंतर त्यांची रवानगी तुरुंगात करण्यात आली होती. आज न्यायमूर्ती राहुल रोकडे यांनी त्यांना सर्व गुन्ह्यांमध्ये जामीन मंजूर केला आहे. रमेश कदम यांना जामीन मिळाल्यानंतर त्यांच्या समर्थकांनी जल्लोष केला. 


काय म्हणाले रमेश कदम?


गेली आठ वर्षे ज्या माध्यमातून माझ्यावर आरोप झाले त्या आरोपांना मी सामोरं गेलो, न्यायालयाच्या चार्जशिटमध्ये जे आरोप होते त्यावर विचार करून मला जामीन दिला त्याबद्दल उच्च न्यायालय आणि सत्र न्यायालयाचा मी मनापासून आभारी आहे. माझ्यावर करण्याते आलेले आरोपांमध्ये तथ्य नाही. अण्णाभाऊ साठे महामंडळाच्या माध्यमातून जो पैसा वाटला गेला तो कर्जरूपाने होता, तो आज ना उद्या मिळेल, ते कर्ज आहे, भ्रष्टाचार नाही. आता पुलाखालून बरंच राजकीय पाणी वाहून गेलं आहे. त्यामुळे माझ्या मूळ विधानसभा मतदारसंघाचा मला अजून अंदाज नाही. मी येत्या काही दिवसांत माझ्या मतदारसंघात जाणार आहे. माझ्या मतदारांशी बोलणार आहे. मगच सर्व राजकीय अंदाज घेऊन माझी भूमिका स्पष्ट करून निर्णय घेणार आहे.


लोकशाहीर अण्णाभाऊ साठे आर्थिक विकास महामंडळ घोटाळ्यात रमेश कदम हे मुख्य आरोपी आहेत. महामंडळाच्या अध्यक्षपदी असताना बोगस लाभार्थी दाखवून रमेश कदमांनी शेकडो कोटींचा घोटाळा केल्याचा आरोप त्यांच्यावर आहे. या प्रकरणी रमेश कदम यांना आठ वर्षापूर्वी अटक केली होती. याच घोटाळ्यावरून राष्ट्रवादी काँग्रेसनं त्यांना पक्षातून निलंबित केलं आहे.  अण्णाभाऊ साठे आर्थिक विकास महामंडळा घोटाळ्याप्रकरणी माजी आमदार रमेश कदम यांना ऑगस्ट, 2015 मध्ये अटक करण्यात आली होती. 


तुरुंगातही वादात 


दरम्यानच्या काळात या ना त्या कारणानं रमेश कदम सतत चर्चेत राहिलेत. मागे एका व्हिडीओ क्लीपमध्ये कदम आर्थर रोड जेलमध्ये कर्तव्य बजावणाऱ्या पोलिसांना शिवीगाळ करत असल्याचं दिसलं होतं. त्यासंदर्भात रमेश कदम यांच्याविरोधात नागपाडा पोलिस स्टेशनमध्ये गुन्ह्यांची नोंद करण्यात आली. मात्र, 'पोलिसांनीच मला जातीवाचक शिवीगाळ केली आणि 25 हजारांची लाच मागितली' असा त्यांचा दावा होता. तसेच भायखळा जेलमध्ये असताना वॉर्डन मंजुळा शेट्ये हत्या प्रकरणातही प्रकरणातही रमेश कदम यांनी पोलिसांवर आरोप केले होते.