नागपूर : लोकसभा निवडणुकीच्या (Loksabha Election 2024) तोंडावर माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे (Sushilkumar Shinde) यांना मोठा झटका बसला आहे. सोलापूर (Solapur News) भाजप शहराध्यक्ष नरेंद्र काळे यांच्यासोबत आज (24 एप्रिल) सोलापूरचे काँग्रेस नेते देवेंद्र कोठे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांची भेट घेत भाजपमध्ये प्रवेश केला. सोलापुरात राजकारणात सक्रिय असलेले कोठे कुटुंबीय तसेच सुशीलकुमार शिंदे यांचे निवडणूक कॅम्पेन सांभाळणारे तात्या कोठे यांचे नातू देवेंद्र कोठे यांनी आज उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नागपूरात निवासस्थानी भाजपमध्ये प्रवेश केला. 


देवेंद्र कोठे यांनी भाजप प्रवेशावर बोलताना सांगितले की, देशाचे पंतप्रधानांवर विश्वास ठेवत आज उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. मी पालकत्व स्वीकारत असल्याचं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणीस यांनी मला सांगितल्याचे देवेंद्र कोठे म्हणाले. नक्कीच सोलापूर लोकसभा मतदारसंघात निकाल हा भाजपच्या बाजूने असेल, असाही दावा त्यांनी केला. 


गेल्या अनेक दिवसांपासून त्यांच्या भाजप प्रवेशाच्या चर्चा


दरम्यान, माजी महापौर महेश कोठे महाविकास आघाडीच्या उमेदवार आमदार प्रणिती शिंदे यांच्या प्रचारात सक्रिय आहेत. त्यांचे पुतणे देवेंद्र यांनी मात्र वेगळा मार्ग स्वीकारला. देवेंद्र कोठे हे माजी नगरसेवक आहेत. महापालिकेच्या २०१७ च्या निवडणुकीत ते शिवसेनेच्या तिकिटावर निवडून आले होते. गेल्या अनेक दिवसांपासून त्यांच्या भाजप प्रवेशाच्या चर्चा होत्या. अखेर नागपूरमध्ये पक्षप्रवेशाचा कार्यक्रम झाला आहे. यावेळी भाजपचे सोलापूर लोकसभा प्रमुख विक्रम देशमुख, शहराध्यक्ष नरेंद्र काळे, माजी महापौर श्रीकांचना यन्नम आदी उपस्थित होते. भाजपची ध्येय धोरणे आवडल्यामुळे आपण पक्ष प्रवेश केला. आता भाजपचे सोलापूर लोकसभेचे उमेदवार राम सातपुते यांच्या प्रचारात सक्रिय होणार असल्याचे कोठे यांनी म्हटले आहे. 


संजय क्षीरसागर शरद पवार गटात 


दुसरीकडे, मोहोळमधील भाजप नेते संजय क्षीरसागर (Sanjay Khirsagar)  शरद पवार गटात प्रवेश करणार आहेत. भाजपत गेल्या दहा वर्षांत कायम अपमानास्पद वागणूक दिली गेली, त्यामुळे मी पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश करत असल्याचे क्षीरसागर यांनी म्हटले आहे. क्षीरसागर आज शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहेत.


 


इतर महत्वाच्या बातम्या