सातारा : राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) यांनी कधीकाळी म्हणजेच ज्या मतदारसंघात लोकसभा निवडणूक लढवली, त्याच माढा लोकसभा (Madha Lok sabha) मतदारसंघात यंदा वार-पलटवार पाहायला मिळत आहेत. माढा लोकसभा मतदारसंघासाठी भाजपाने रणजीतसिंह नाईक निंबाळकर (Ranjisingh Naik nimbalkar) यांची उमेदवारी जाहीर केल्यापासूनच हा मतदारसंघ राज्याच्या राजकारणात केंद्रस्थानी आला आहे. रणजीतसिंह नाईक निंबाळकर यांच्या उमेदवारीला माढ्यातून मोहिते पाटलांनी विरोध केला. तर, फलटणमधून अजित पवारांसोबत (Ajit Pawar) असलेल्या आमदार रामराजे नाईक निंबाळकर यांच्या कुटुंबीयांनी विरोध केला. त्यामुळे, देवेंद्र फडणवीसांना धक्का आणि अजित पवारांशी बंडखोरी करत आज निंबाळकर कुटुंबीयांनी धैर्यशील मोहिते पाटील यांच्या प्रचारासाठी नारळ फोडला. यावेळी, तुतारी वाजवून मंदिरात स्वागत करण्यात आलं.
धैर्यशील मोहिते पाटलांच्या प्रचाराचा नारळ आज फलटणमध्ये रामराजे यांचे चिरंजीव अनिकेत राजे नाईक निंबाळकर यांनी वाढवला. फलटणच्या राम मंदिरात सर्वच स्थानिक राजकीय नेतेमंडळी व पदाधिकारी जमली होती, त्यांच्या उपस्थितीत हा नारळ वाढवण्यात आला. संजीव नाईक निंबाळकर यांच्या पत्नी आणि चिरंजीवही यावेळी उपस्थित होते. माढा लोकसभा मतदारसंघात आपण तुतारी हातात घेणार असल्याचे रघुनाथराजे नाईक निंबाळकर यांनी आधीच सांगितले होते. रामराजें यांचे चिरंजीव अनिकेत राजेनाईक निंबाळकर यांनी नारळ वाढवल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. कारण, रामराजे नाईक निंबाळकर हे अद्यापही अजित पवार यांच्यासमवेत आहेत. मात्र, रणजीतसिंह नाईक निंबाळकर यांच्या उमेदवारीला त्यांचा व कुटुंबीयांचा थेट विरोध आहे. आजच्या फलटणमधील कार्यक्रमातून तो विरोध स्पष्ट झाला आहे.
रामराजेंच्या कुटुंबातील सदस्यांची उपस्थिती
विजयसिंह मोहिते पाटील आज रणजीतसिह नाईक निंबाळकर यांच्या बालेकिल्ल्यात आले आहेत. धैयशील मोहिते पाटील यांच्या प्रचाराचा नारळ फोडण्यासाठी विजयसिंह मोहिते पाटील फलटणमध्ये आले होते. फलटणमधील प्रसिद्ध राम मंदीरात प्रचाराचा नारळ फोडण्याचा कार्यक्रम होत, त्यासाठी खास विजयसिंह मोहिते पाटील उपस्थित होते. या कार्यक्रमाला रामराजे उपस्थित नसले तरी त्यांचा मुलगा अनिकेतराजे, संजीव राजे नाईक निंबाळकर यांचा मुलगा आणि पत्नी उपस्थित होत्या. तसेच, रघुनाथराजे नाईक निंबाळकर, सुभद्रा नाईक निंबाळकर हेही उपस्थित होते. संजीवराजे नाईक निंबाळकर हे अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे सातारा जिल्हा अध्यक्ष आहेत.
माढ्याची रंगतदार लढत
माढ्यामध्ये यंदा चांगलीच चुरस पाहायला मिळत आहे. शरद पवारांनी थेट माढ्यात लक्ष घातल्याने अनेक डावपेच दिसून येतात. तर, फडणवीसांचीही प्रतिष्ठा माढा मतदारसंघातून पणाला लागली आहे. गत लोकसभा निवडणुकीत सहज विजय मिळवणाऱ्या रणजीतसिंह नाईक निंबाळकरांची यंदा अडचण झाली असून भाजपासोबत असलेल्या नेत्यांनीच बंडखोरी केल्यामुळे माढ्याची लढाईत रंगत पाहायला मिळत आहे. विशेष म्हणजे भाजपासोबत असलेलं मोहिते पाटील कुटुंब थेट विरोधात गेल्यामुळे भाजपची डोकेदुखी वाढली असून शरद पवारांनी उत्तम जानकर, मोहोळमधून क्षीरसागर यांनाही आपल्यासोबत घेतले आहे.