Sharad Pawar : लोकसभा निवडणुकीच्या (Loksabha Election) पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण चांगलच तापत असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. सर्वच राजकीय पक्षाच्या बड्या नेत्यांच्या सभा सुरु आहेत. अशातच माढा लोकसभा (Madha Loksabha) मतदारसंघाची देखील जोरदार चर्चा सुरु आहे. शरद पवार (Sharad pawar) गटाकडून राज्याचे माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील यांचे पुतणं धैर्यशील मोहिते पाटील (Dhairyasheel mohite patil) निवडणूक लढवत आहेत. मोहिते पाटलांच्या प्रचारासाठी आज माढा तालुक्यातील मोडनिंबमध्ये शरद पवारांची जाहीर सभा होणार आहे.
माढा तालुक्यात शिंदे बंधुंचं वर्चस्व
माढा तालुक्यात आमदार बबनदादा शिंदे (Babandada Shinde) आणि त्यांचे बंधू आमदार संजयमामा शिंदे (Sanjaymama shinde) यांचेवर्चस्व आहे. या दोन्ही बंधुंनी शरद पवारांची साथ सोडत अजित पवार यांच्याबरोबर जाण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानंतर प्रथमच शरद पवार यांची माढा तालुक्यात एखादी राजकीय सभा पार पडत आहे. त्यामुळं शरद पवार आज नेमकं काय बोलणार याकडं सर्वाचं लक्ष लागलं आहे.
धैर्यशील मोहिते पाटील यांच्यासाठी खुद्द शरद पवार मैदानात
माढा लोकसभा मतदारसंघात भाजपकडून पुन्हा एकदा रणजितसिंह निंबाळकरांना संधी देण्यात आली आहे. त्यामुळं मोहिते पाटील नाराज होते. धैर्यशील मोहिते पाटील हे भाजपकडून निवडणूक लढवण्यास इच्छुक होते. मात्र, त्यांना भाजपनं डावलले. निंबाळकरांनाच भाजपनं पुन्हा एकदा रिंगणात उतरवलं आहे. त्यानंतर मोहिते पाटील यांनी शरद पवार गटात प्रवेश करत हाती तुतारी घेत निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळं माढा लोकसभेची राजकीय गणितं बदलण्याची शक्यता वर्तवली जात आहे. खुद्द शरद पवार हे धैर्यशील मोहिते पाटील यांच्यासाठी मैदानात उतरल्याचे पाहायला मिळत आहे.
भाजपचे नेते संजय क्षीरसागर हे शरद पवार गटात प्रवेश करणार
दरम्यान, थोड्याच वेळात शरद पवार हे माढा लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार धैर्यशील मोहिते पाटील यांच्या प्रचारासाठी मोडनिंबमध्ये येणार आहेत. सुरुवातीपासून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना धक्क्यावर धक्के देत असलेले पवार आजच्या सभेत काय बोलणार याकडे सर्वांचे लक्ष लागलं आहे. दरम्यान, मोडनिंब येथील सभा झाल्यावर शरद पवार हे मोहोळ येथे सभा घेणार आहेत. मोहोळमध्ये भाजपचे नेते संजय क्षीरसागर हे शरद पवार गटात प्रवेश करणार आहेत.
महत्वाच्या बातम्या: