Madha Vidhansabha constituency: राज्यात लोकसभा निवडणुकानंतर विधानसभा निवडणुकांचे वेध इच्छुकांना लागलेले असताना 'मी माढ्याची कुस्ती जिंकायला आलोय', असं म्हणत सोलापूरच्या विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष अभिजीत पाटील यांनी कुस्तीचा सामना रंगवत विधानसभेसाठी शड्डू ठोकलाय. गेल्या सहा टर्म पासून माढ्यातून एकतर्फी विजय मिळवणारे जेष्ठ आमदार बबनदादा शिंदे यांना आव्हान देत आमदार शिंदे त्यांचे पुत्र रणजीत सिंह शिंदे यांना मैदानात उतरवण्याचा तयारीत आहेत. अभिजीत पाटील यांच्या विधानसभेतील एन्ट्रीनं माढ्याचा सामना रंगतदार होण्याची शक्यता आहे.


विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष अभिजीत पाटील यांनी माढ्यात काल माढा केसरी या कुस्ती स्पर्धांचा आयोजन करत विधानसभेसाठी रणशिंग फुंकलंय. या स्पर्धेला माढ्यातील नागरिकांनी प्रचंड मोठा प्रतिसाद देत अभिजीत पाटील यांचा जंगी स्वागतही केलं. यावेळी माढ्यात कुस्ती खेळायला नाही तर जिंकायला उतरलो आहोत असा दावा अभिजीत पाटील यांनी केलाय.


काय म्हणाले अभिजीत पाटील? 


विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष अभिजीत पाटील यांनी माढ्यातील कुस्ती सामन्यात विधानसभेसाठी रणशिंग फुंकले. ते म्हणाले, कुस्ती हा एक खेळ आहे. आपण यावेळी माढ्यात कुस्ती खेळायला नाही तर जिंकायला उतरलो आहोत. असं ते म्हणाले. 


मागील सहा टर्म पासून माढ्यात एकतर्फी विजय मिळवणारे जेष्ठ आमदार बबनदादा शिंदे यांना आव्हान देणे सोपे नसले तरी यंदा आमदार शिंदे हे त्यांचे पुत्र रणजीत सिंह शिंदे यांना मैदानात उतरवायचा तयारीत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाचे तिकीट मिळवण्यासाठी सध्या अनेकांची धडपड सुरू आहे. यात आमदार शिंदे यांचे पुतणे धनराज शिंदे हे देखील प्रयत्नशील असून अभिजीत पाटील यांच्या एन्ट्रीने माढ्याची लढत चुरशीची होणार आहे. 


कोणाकडून कोणता उमेदवार असेल? 


शरद पवार गटाकडून संजय बाबा कोकाटे, शिवबाबा मोहिते पाटील, शिवाजीराजे कांबळे तसेच यांच्या नावांची उमेदवारीसाठी चर्चा आहे.  महायुतीकडून शिवसेनेचे संपर्कप्रमुख शिवाजी सावंत तर अजित पवार गटाकडे सध्या येथील आमदारकी असून विद्यमान आमदार हे महायुतीकडून न लढता शरद पवार यांची तुतारी किंवा अपक्ष लढण्याच्या तयारीत असल्याची ही चर्चा आहे. अशातच अभिजीत पाटील यांनी माढ्यातून जोरदार तयारीला सुरुवात केल्याने ही लढत बहुरंगी होण्याची शक्यता आहे. काल आयोजित केलेल्या माढा केसरी स्पर्धेसाठी शेकडोच्या संख्येने नागरिकांनी प्रतिसाद दिल्याने अभिजीत पाटील हेही रेस मध्ये उतरू लागले आहेत अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.
 


माढा विधानसभा मतदार संघात सध्या स्थिती काय? 


राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचा बालेकिल्ला म्हणून माढ्याची ओळख आहे. 2009 मध्ये या मतदारसंघाची निर्मिती झाल्यानंतर शरद पवार येथून खासदार झाले होते. त्यानंतर 2014 मध्ये विजयसिंह मोहिते पाटील हे खासदार झाले. पुढे 2019 ला त्यांनी भाजप प्रवेश केला. माढा विधानसभेत सध्या बबन शिंदे हे अजित पवार गटाचे म्हणजे महायुतीचे आमदार आहेत. 2019 च्या निवडणुकीत रणजीत सिंह नाईक निंबाळकर हे विजयी झाले होते.