मुंबई: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा महत्त्वकांक्षी वाढवण बंदर प्रकल्प या प्रकल्पाचे भूमिपूजन 30 ऑगस्ट रोजी होणार असल्याचे सांगितले जाते. त्यादृष्टीने हालचालींना वेग आला आहे. मात्र, या बंदराला स्थानिकांचा मोठ्या प्रमाणात विरोध होत आहे. गेल्या पंचवीस वर्षांपासून किनारपट्टीवरील स्थानिक या बंदराला विरोध करत आहेत. पालघर जिल्ह्यातील डहाणू (Dahanu News) तालुक्यात वाढवण येथे समुद्रात हे बंदर उभारले जाणार असून या बंदरासाठी तब्बल 76 हजार 200 कोटी इतका निधी मंजूर झाला असून केंद्र सरकारने पहिल्याच कॅबिनेट बैठकीमध्ये वाढवण बंदराला (Vadhavan port) मंजुरी दिली होती. तर राज्य मंत्रिमंडळाची सुद्धा या बंदराला मंजुरी मिळाली असल्याने बंदराच्या हालचालीला वेग आलेला पाहायला मिळतोय.


येत्या 30 ऑगस्ट ला वाढवण बंदराचे भूमिपूजन पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi) यांच्या हस्ते होणार असल्याचे सांगितले जाते. त्यामुळे स्थानिक विविध संघटनांनी या सोहळ्याला विरोध दर्शवला असून चक्काजाम आंदोलन , जेल  भरो आंदोलन करणार असल्याचे सांगितले जात असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ताफ्याला काळे झेंडे सुद्धा दाखवणार असल्याचे युवा संघर्ष समितीचे सचिव मिलिंद राऊत यांनी सांगितले आहे. त्यामुळे वाढवण बंदराचा संघर्ष हा अधिकच चिघळण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे . तर सध्या जेएनपीटीचे कार्यालय आणि इतर गोष्टींसाठी काही शासकीय जागा आरक्षित करण्याच्या हालचालींना सुद्धा वेग आला आहे.


वाढवण बंदरासाठी 571 हेक्टर जमिनीचे अधिग्रहण


वाढवण बंदराच्या प्रत्यक्ष कामाला 2025 मध्ये पावसाळ्यानंतर सुरुवात होणार आहे. मात्र, त्यापूर्वी वाढवण बंदराकडे जाणाऱ्या रस्त्यांची निर्मिती केली जाणार आहे. हे काम यंदाच्या सप्टेंबर महिन्यानंतर सुरु होईल. मालाची ने-आण करण्यासाठी उभारण्यात येणाऱ्या रस्ते आणि रेल्वे मार्गासाठी 28 गावांमधील 571 हेक्टर जमिनीचे अधिग्रहण करावे लागणार आहे. याशिवाय, वाढवण येथे 76 हजार 220 कोटी रुपये खर्चुन ग्रीनफिल्ड बंदराची उभारणी केली जात आहे. समुद्रात सहा किलोमीटर आतमध्ये हे बंदर उभारले जाणार असून त्यासाठी समुद्रात सुमारे 1448 हेक्टर एवढा भराव टाकला जाणार आहे.  या बंदराच्या उभारणीसाठी तब्बल 77 हजार कोटींचा खर्च अपेक्षित असून 2029 पर्यंत बंदराचे काम पूर्ण होईल, असा अंदाज आहे. या बंदरामुळे मोठ्याप्रमाणावर रोजगारनिर्मिती होईल, असा दावा सरकारकडून केला जात असला तरी स्थानिकांचा वाढवण बंदराला विरोध आहे.


वाढवण बंदरामुळे काय फायदा होणार?


समुद्रकिनाऱ्यावर वीस मीटरपेक्षा जास्त खोली असलेलं वाढवण हे देशातील एकमेव नैसर्गिक बंदर आहे. त्यामुळे या बंदरामध्ये अजस्त्र कंटेनर्स जहाजे सहज येऊ शकतील. या जहाजांमधून 35 ते 50 हजार टन क्षमतेचा माल एकाएका जहाजातून येथे उतरवला जाऊ शकतो, असं या बंदराचं वैशिष्ट्य आहे. या बंदराचं काम दोन टप्प्यांमध्ये करण्यात येणार आहे. त्यासाठी 76 हजार दोनशे कोटी रुपये खर्च प्रस्तावित आहेत. जवळपास 298 दशलक्ष टन क्षमतेच बंदर संपूर्ण देशासाठी गेमचेंजर ठरेल, असे सांगितले जात आहे.


आणखी वाचा


प्रस्तावित वाढवण बंदराला वाढता विरोध, मुख्यमंत्र्यांनी बोलावली तातडीची बैठक