नांदेड : माहूर तालुक्यातील मौजे रुई येथे भावकीच्या शेतीच्या वादातून मोठ्या भावाने चुलत भावाचा खून केला आहे. जमिनीचा वाद सोडवण्यासाठी पोलीस पाटलांच्या घरी बैठक बोलवण्यात आली होती. मात्र बैठकीत तोडगा न निघाल्याने मोठ्या भावाने मध्यस्थीसमोरच चुलत भावाचा विळ्याने वार करून खून हा खून केला आहे. 18 ऑगस्ट रोजी ही धक्कादायक घटना घडली आहे. परवेज पंटुष देशमुख (वय 21 वर्षे) असे मृतकाचे नाव आहे. पोलीस या घटनेचा अधिक तपास करत आहेत.


शेतीचा वाद सोडवण्यासाठी बोलवली होती बैठक


मयत परवेजचे वडील पंटुष मीर साहेब देशमुख (वय 59) यांनी दिलेल्या फिर्यादी प्रमाणे रुई शेतशिवारात गट नं 215 मध्ये 20 गुंठे शेतजमीन आहे. 18 ऑगस्ट रोजी सकाळी 9 वाजता पुतण्या साहील बचलू देशमुख याचा पंटुष देशमुख यांच्याशी शेतीसंबंधी वाद होता. हाच वाद सोडवण्यासाठी गावाचे पोलीस पाटील परसराम कामाजी भोयर यांच्या घरी बैठक बोलावण्यात आली होती. त्यावेळी तेथे तक्रारदार पंटुष देशमुख आणि त्यांचा मुलगा परवेज पत्नी साजराबी, पुतण्या पप्पू मीरसाहेब देशमुख, पुतण्या साहील बबलू देशमुख, सोहेब बबलू देशमुख, भावजय फिरोजा देशमुख, जावई शेइंरशाद हे हजर होते. तसंच त्यावेळी गावातील सरपंचाचे पती गणेश सदाशिव राउत, पोलीस पाटील परसराम कामाजी भोयर, तंटामुक्ती अध्यक्ष उत्तमराव भगाची सुकळकर हेदेखील उपस्थित होते. 


माझी अडीच एकर जमीन द्या


या बैठकीत शेतीसंबंधीच्या वादावर चर्चा चालू झाली. त्यामध्ये पुतण्या साहील बबलू देशमुख हा म्हणाला की, आमची जमीन कोठे आहे आम्हाला तुम्ही अडीच एकर जमीन द्या. त्यावेळी पंटुष देशमुख यांनी बबलू देशमुख याला सांगितले की, तुमची जमीन तुमचे वडील बबलू देशमुख यांनी पूर्वीच विकली आहे. तर बैठकीला हजर असलेल्या इतरांनी जमिनीवरून वाद करू नका, असे आवाहन केले. 


पाठीमागून पकडून विळ्याने वार


बैठक संपल्यानंतर सर्वजण घरी जात होते. पण त्याच वेळी साहील बबलू देशमुख याने परवेज यास पाठीमागून पकडले. साहीलने लोखंडी विळा घेतला आणि परवेजच्या छातीवर वार केले. या घटनेनंतर साहील बबलू देशमुख, सोहेब बबली देशमुख हे पळून गेले. छातीवर वार झाल्यानंतर परवेज चांगलेच जखमी झाली. त्यांना तत्काळ माहूर येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र डॉक्टरांनी तपासणी करुन त्यांना पुढील उपचाराकरीता दुसऱ्या रुग्णालयात दाखल करण्यास सांगितले. परवेज यांना पुसद येथील मेडीकेअर हॉस्पीटल येथे नेण्यात आले. मात्र तेथे डॉक्टरांनी तपासणी करून परवेज यांना मृत घोषित केले. 
दरम्यान, याबाबत माहूर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. पोलीस या प्रकरणातील फरार आरोपीचा शोध घेत आहेत. 


हेही वाचा :


Pune Crime News: चारित्र्याच्या संशयातून पत्नीचा खून केला त्याच खोलीत झोपला अन्...; पुण्यातील धक्कादायक घटना


Pune Crime News : पुण्यात मध्यरात्री भरचौकात गुंडाचा खून, पाठलाग करून टोळक्यानं दगडाने ठेचलं