बेळगाव : काकती पोलिस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या एका गावात सहा वर्षाच्या बालिकेवर अत्याचार करणाऱ्या नराधमाला पोलिसांनी अटक केली आहे. त्याला न्यायालयात हजर करून परत घेऊन जात असताना न्यायालयात जमलेल्या लोकांनी त्याला चांगला चोप दिला. यावेळी पोलिसांना आरोपीला जमावाच्या तावडीतून सोडवून घेण्यासाठी बरेच कष्ट घ्यावे लागले. यावेळी नागरिकांनी श्रीराम सेनेच्या नेतृत्वाखाली रास्ता रोको करून आंदोलन करण्यात आले.

पोलिसांनी अटक केलेल्या आरोपीचे नाव सुनील बाळनाईक असं आहे. बुधवारी ही घटना घडली आहे. आरोपीने सहा वर्षाच्या बालिकेला खेळवून आणतो असे सांगून तिला शेतातील घरी नेले. तिथे त्या बालिकेवर त्याने अत्याचार केला. नंतर मुलीच्या घरच्यांना संशय आला. यानंतर मुलीशी विचारपूस केल्यानंतर घडलेली घटना समजली. यानंतर लगेच मुलीच्या वडिलांनी याबाबत काकती पोलिसात बुधवारी रात्री तक्रार दाखल केली. पोलिसांनी तक्रारीची दखल घेऊन लगेच आरोपी सुनील बाळनाईक याला अटक केली. पीडित बालिकेला वैद्यकीय तपासणी आणि उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

हैद्राबाद येथे घडलेल्या घटनेनंतर जनमानसात महिलांवर अत्याचार करणाऱ्या विरोधात संतापाची लाट उसळली असून महिलांवर अत्याचार करणाऱ्या व्यक्तीला कडक शिक्षा करा अशी मागणी होत आहे. सुनील बाळनाईक याला न्यायालयात हजर करण्यात येणार असल्याची माहिती लोकांना कळली. ही माहिती कळताच न्यायालय आवारात लोक बरेच जमले होते. न्यायालयातून आरोपीला बाहेर आणताच त्याला पोलिसांनी गाडीकडे नेले. मात्र गाडीकडे त्याला नेत असतानाच लोकांनी धक्काबुक्की करून आरोपीला जोरदार चोप दिला. लोकांनी अचानक घेतलेल्या या पवित्र्यामुळे पोलिसांची तारांबळ उडाली. लोकांना पांगवून पोलिसांनी आरोपीला वाहनात बसवून तिथून हलवले. यावेळी लोकांनी आरोपीच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. गुन्हेगाराला फाशीची शिक्षा द्या, अशी मागणी करत रास्ता रोको करण्यात आला. अखेर काही वेळाने रास्ता रोको मागे घेण्यात आला.

दरम्यान या घटनेमुळे कडोली आणि परिसरात संतापाची लाट उसळली आहे. आरोपीला कडक शिक्षा करावी अशी मागणी नागरिकांनी केली आहे.