ब्रिटनचे उद्योग पती रिचर्ड ब्रॅन्सन यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची गुरुवारी (12 डिसेंबर) मातोश्री येथे सदिच्छा भेट घेतली. दहा अरब डॉलर खर्चाची मुंबई-पुणे हायपरलूप या योजनेसंदर्भातील गैरसमज दूर करण्यासाठी आणि नवीन सरकारला या प्रोजेक्टची माहिती देण्यासाठी ही सदिच्छा भेट घेण्यात आली. देशभरामध्ये वेगवेगळे प्रकल्प सध्या नावारूपाला येत आहेत. त्यापैकी महत्वकांक्षी मुंबई-पुणे हाइपरलूप हा प्रकल्प आहे. या प्रकल्पासंदर्भात मागील सरकार ज्या पद्धतीने सकारात्मक होतं त्याच पद्धतीने नवीन सरकारलाही याची माहिती देऊन त्यांनाही या प्रकल्पात सकारात्मक दृष्टीकोन दाखवण्यासाठी आजची ही भेट महत्त्वपूर्ण होती. या भेटीदरम्यान शिवसेनेचे नेते सुभाष देसाई, आदित्य ठाकरे आदी उपस्थित होते.
काय आहे हायपरलूप?
मुंबईहून पुणे गाठण्यासाठी रस्ता किंवा रेल्वेमार्गाने किमान तीन तास लागतातच. जवळपास दीडशे किलोमीटरचं हे अंतर भविष्यात अवघ्या 20 ते 25 मिनिटांत कापता येणार आहे. राज्य सरकारने पुणे-मुंबई हायपरलूप कॉरिडोरसाठी अमेरिकास्थित व्हर्जिन हायपरलूप कंपनीशी ‘लेटर ऑफ इंटेंट’ (आशय पत्र) वर स्वाक्षरी केली आहे.
पहिला हायपरलूप मार्ग मध्य पुण्याहून नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळालाही जोडणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते 18 फेब्रुवारीला नवी मुंबई विमानतळाच्या कामाचं भूमीपूजन करण्यात आलं आहे. हायपरलूप ट्रेनचा ताशी वेग एक हजार किमी असणार आहे. प्रवासी आणि कार्गोची जलदगतीने वाहतूक करण्यासाठी हायपरलूपचा व्यावसायिक पातळीवर उपयोग केला जातो. रिचर्ड ब्रॅन्सन यांनी कॅलिफोर्नियात व्हर्जिन हायपरलूप कंपनीची स्थापना केली.
हायपरलूप ट्रान्सपोर्टेशन सिस्टीम काय आहे?
दोन शहरांना जोडणाऱ्या भव्य ट्यूब्स बांधल्या जातात. (एक मुंबईकडे जाणारी, तर पुण्याच्या दिशेने) ट्रेनप्रमाणे स्पेशल कम्पार्टमेंट एका दिशेने दुसरीकडे प्रवास करतात.
ठराविक अंतराने असलेल्या मॅग्नेटिक अॅक्सलरेटर्समुळे हे कम्पार्टमेंट पुढे सरकत राहतील. कम्पार्टमेंट भोवती हवेचा कमी दाब तयार करुन वेग वाढवला जाईल.
प्रवाशांची वाहतूक करताना त्यांचा वेग ताशी एक हजार किमी असेल, असं रिचर्ड ब्रॅन्सन यांनी म्हटलं आहे. प्रत्यक्षात याच्या निम्म्या वेगाने प्रवास झाला, तरी दोन शहरांमधील प्रवासाचा वेळ प्रचंड प्रमाणात वाचेल.मुंबईत पीक अवर्समधील ट्राफिक पाहता या वेळेत वांद्र्याहून सांताक्रुझ गाठायला जितका वेळ लागेल, तितकाच वेळ सांताक्रुझहून पुणे गाठायला लागू शकतो.