भिवंडी : मुक्या दाम्पत्याच्या 6 महिन्यांच्या बाळाला खेळण्याच्या बहाण्याने नेऊन त्याची परस्पर विक्री केल्याची घटना फातमानगर इथे रविवारी घडली होती. अरमान इस्तियाक अंसारी ( 6 महिने ) असे अपहरण झालेल्या बाळाचे नाव आहे. या घटनेने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. सदर मुलाची आई अस्मा ( 30 ) आणि वडिल इस्तियाक (35) हे दोघेही मुके आहेत. त्याचा फायदा घेत शेजारी राहणारी महिला फरीदा अंसारी ( 40) आणि तिच्या 17 वर्षाच्या अल्पवयीन मुलाने या लहान बाळाला खेळवण्याच्या बहाण्याने नेऊन त्याची विक्री केला.
आरोपींनी या मुलाला गायब करण्याच्या हेतूने सुरुवातीला 5 डिसेंबर रोजी घरातून नेऊन त्याला 6 डिसेंबर रोजी घरी आणलं. त्यानंतर पुन्हा 6 डिसेंबर रोजी सायंकाळी त्याला घरातून नेऊन 16 डिसेंबर रोजी घरी आणले. मात्र, पुन्हा 16 डिसेंबर रोजी नेऊन 21 डिसेंबरला त्याला आणले होते. मात्र, पुन्हा त्यास खेळण्याच्या बहाण्याने घरातून नेऊन गायब केलं. आपलं बाळ हरवल्यामुळे आई वडिलांनी शोधाशोध सुरू केली परंतु बाळ काही मिळून आलं नाही. त्यानंतर मुक्या आई-वडिलांनी पोलीस ठाण्यात धाव घेतली आणि बाळ हरवल्याची तक्रार दिली.
बाळ गायब असल्याच्या घटनेची खबर इस्तियाक याचा भाऊ इलियास अंसारी यास समजली. त्याने याबाबत अधिक चौकशी केली असता शेजारची महिला फरीदा आणि तिच्या मुलाने संगनमताने बाळाला खेळवण्याच्या बहाण्याने नेल्याचा संशय आला. यावर त्यांच्याकडे मुलाबाबत विचारणा केली असता त्यांनी उडवा-उडवीची उत्तरे दिली. त्यामुळे इलियासने शांतीनगर पोलीस ठाणे गाठून फरीदा आणि तिच्या मुलाविरोधात गुन्हा दाखल केला आहे. गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन रात्री उशिराने पोलीस निरीक्षक (गुन्हे ) नितीन पाटील यांनी संशयीत अपहरणकर्ती फरीदा अंसारी हिला ताब्यात घेऊन चौकशी केली.
आई-वडील मूकबधिर असल्याने पोलिसांसमोर एक मोठं आव्हान होतं. आई-वडिलांनी दिलेल्या माहितीनुसार बाळाला शोधणे कठीण होते. मात्र एका मूकबधिर दाम्पत्याला त्यांचं सहा महिन्याचा बाळ मिळवून देणे हे पोलिसांनी ठरवलं. पोलिसांची तीन टीम तयार केल्या. दरम्यान या घटनेसंबंधित सर्व माहिती पोलिसांना घोळा करत अखेर ज्या ठिकाणी बाळाला विकण्यात आलं होतं, त्या ठिकाणी शांती नगर पोलिस दाखल झाले. बाळाला तिथून घेत भिवंडी पोलीस उपायुक्त राजकुमार शिंदे आणि अन्य अधिकाऱ्यांनी मिळून मूकबधिर असलेल्या आई-वडिलांच्या बाळ हवाली केलं. आपलं बाळं पाहून त्या माय-बापाच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहिलेला दिसून आला.
मुक्या आई-वडिलांचं सहा महिन्याचं लेकरू शेजाऱ्यांनी विकलं, पोलिसांच्या तत्परतेनं बाळ मिळालं
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
24 Dec 2019 10:45 PM (IST)
आई-वडील मूकबधिर असल्याने पोलिसांसमोर एक मोठं आव्हान होतं. आई-वडिलांनी दिलेल्या माहितीनुसार बाळाला शोधणे कठीण होते. मात्र एका मूकबधिर दाम्पत्याला त्यांचं सहा महिन्याचा बाळ मिळवून देणे हे पोलिसांनी ठरवलं. पोलिसांची तीन टीम तयार केल्या.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -