मुंबई : मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर आणि लिटल मास्टर सुनिल गावसकर यांनी आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. या भेटीच मागचं कारण सुरक्षाव्यवस्थेत करण्यात आलेल्या कपातीचं असल्याची माहिती मिळत आहे. नव्या सरकारनं काही लोकांची सुरक्षा कमी केली आहे. त्यात सचिन तेंडुलकरचा समावेश आहे. आपली सुरक्षा वाढवण्यात यावी अशी मागणी सचिनने मुख्यमंत्र्यांकडे केल्याची चर्चा आहे.


महाआघाडीचे नविन सरकार स्थापन होताच अनेकांच्या सुरक्षाव्यवस्थेत कपात करण्यात आली आहे. यामध्ये काही भाजपचे नेते, वकील, अधिकाऱ्यांचा समावेश होता. त्यात सचिन तेंडुलकरच्या नावाचा समावेश आहे. या अगोदर सचिन तेंडुलकर यांना एक्स दर्जाची सुरक्षा पुरवण्यात येत होती.

सचिन तेंडुलकर यांना एक्स दर्जाची सुरक्षा पुरवण्यात येत होती. मात्र सत्तास्थापनेनंतर 17 आणि 18 डिसेंबरला सुरक्षाव्यवस्थेचा आढावा घेण्यासाठी एक कमिटीची बैठक घेण्यात आली. या बैठकीत एक्स श्रेणीची सुरक्षितेत कपात करण्यात आली आहे. म्हणजेच त्यांना सुरक्षा पुरवण्याची गरज नाही असा निर्णय घेण्यात आला आहे.

सचिनला सध्या 'एक्स' श्रेणीतील सुरक्षा देण्यात आली आहे. एखाद्या व्यक्तिला दिली जाणारी सुरक्षा कायम स्वरुपाची नसते. वेळोवेळी त्याचा आढावा घेऊन सुरक्षेची श्रेणी बदलण्याचा अधिकार राज्य पोलिस प्रशासनाकडे असतो. त्यानुसार सचिनच्या सुरक्षिततेमध्ये बदल होण्याची शक्यता आहे. ही सुरक्षा कायम ठेवावी, अशी विनंती सचिन तेंडुलकरने मुख्यमंत्र्यांकडे केल्याचे समजते.

एक्स श्रेणी सुरक्षा व्यवस्थेमध्ये दोन सुरक्षा रक्षक असतात. हे दोन्ही सुरक्षा रक्षक हे राज्य पोलिस दलातील असतात. एक्स श्रेणीतील व्यक्तीच्या सुरक्षेसाठी एक पीएसओ ( पर्सनल सिक्युरीटी ऑफिसर) देण्यात येतो. सचिनने त्याला एक्स श्रेणीत ठेवावं अशी विनंती या भेटीदरम्यान केल्याची माहिती समोर आहे. मात्र अद्याप याबाबत कोणताही निर्णय घेण्यात आलेला नाही. सचिन हा केवळ भारताचा महान क्रिकेटपटू नाही तर त्याला भारताचा सर्वोच्च नागरी पुरस्कार असलेल्या भारतरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. त्यामुळे सचिनच्या विनंतीनंतर मुख्यमंत्री याबाबत काय निर्णय घेणार? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.