सिंधुदुर्ग : सिंधुदुर्ग (Sindhudurg) जिल्ह्यातील देवगड तालुक्यातील किंजवडे ग्रामपंचायतीने (Kinjawade Village) एक अनोखा उपक्रम राबविला आहे. नवविवाहित जोडप्याला विवाहाच्या दाखल्यासाठी एक वृक्ष लागवड करुन त्याचा फोटो अपलोड केल्यानंतर विवाह नोंदणी प्रमाणपत्र मिळेल. यामुळे जागतिक तापमानवाढ, वाढत्या वायू प्रदूषणाला आळा घालण्यासाठी अशा प्रकारचा अनोखा प्रयोग जिल्ह्यातील एकमेव किंजवडे ग्रामपंचायतीने केला आहे.


किंजवडे ग्रामपंचायतीने गावात अनोखा उपक्रम सुरु केला आहे. पर्यावरणाचे संतुलन राखण्यासाठी नवविवाहीत दाम्पत्याने विवाहाचा दाखला मिळण्यासाठी आपल्या जागेमध्ये दोन नवीन वृक्ष लागवड करायचे आणि त्याची छायाचित्र देणे बंधनकारक आहे. त्यानंतर विवाह नोंदणी प्रमाणपत्र देण्यात येईल. ही अनोखा संकल्पना किंजवडे ग्रामपंचायतीने राबविल्यामुळे सर्वस्तरावरुन त्यांचे कौतुक करण्यात येत आहे.


किंजवडे गावाला एक ऐतिहासिक पण आहे. संपूर्ण गाव हा देवस्थान ईनाम गाव म्हणून ओळखला जातो. महाराष्ट्र शासनाच्या पर्यावरण व वातावरणातील बदल विभागामार्फत नागरिक आणि ग्रामीण क्षेत्रासाठी राबविण्यात येणारा अनोखा एकात्मिक असा उपक्रम 'माझी वसुंधरा अभियान' आहे. याच अभियानाच्या माध्यमातून किंजवडे गावचे सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, ग्रामसेवक व गावातील ग्रामस्थांनी विवाह नोंदणीची एक नवीन संकल्पना राबविली आहे. गावामधील विवाह झालेल्या व्यक्तींनी इतर कागदपत्रांबरोबरच आता आपल्या जमीनीमध्ये कोणत्याही प्रकारचे दोन वृक्ष नवीन लागवड करुन त्या वृक्षांसोबत छायाचित्र काढून विवाह नोंदणी दाखला मिळण्यासाठी ग्रामपंचायतीला देणे बंधनकारक केले आहे. 


ज्या व्यक्तींची जमीन कमी असेल किंवा घरमर्यादित असेल अशा ग्रामस्थांनी देखील आपल्या घराच्या अंगणामध्ये कोणत्याही प्रकारची दोन वृक्ष लागवड करावयाची आहे. ज्या शेतकऱ्यांची जास्त प्रमाणात जमीन असेल असे शेतकरी दोनपेक्षा जास्त वृक्ष लागवड करुही शकतात. यामुळे आपल्या उत्पन्नाचे साधन देखील वाढेल. यामुळे पडीक जमीन लागवडीखाली किंवा अन्य पिकाखाली येऊ शकते. वृक्ष लागवडीचा नारा शासन वेळोवेळी देत आहे. मात्र काही गावांमध्ये पर्यावरण दिनानिमित्त छायाचित्र प्रसिध्दीच्या मर्यादितच वृक्ष लागवड केली जाते. ही औपचारिकता न राहता प्रत्यक्षात वृक्ष लागवड करुन त्याची मनापासून जोपासना झाली पाहिजे.  पर्यावरणाचे संतुलन राखले पाहिजे. त्या वृक्ष लागवडीपासून उत्पन्न देखील सदर शेतकऱ्यांना मिळाले पाहिजे. याच हेतूने किंजवडे ग्रामपंचायतीने एक वेगळा संकल्प राबविला आहे. 


हे ही वाचा :


Yeola Gobardhan Gas : कचऱ्यापासून मुक्तता करत गावात राबवली सुंदर संकल्पना, ग्रामपंचायतीने गावात उभारला ' गोबरधन' गॅस प्रकल्प