Sindhudurg Crime सिंधुदुर्ग: सावंतवाडीमधील रोणापाल-सोनुर्ली येथील घनदाट जंगलात 27 जुलै रोजी एक विदेशी महिला साखळदंडाने बांधलेल्या अवस्थेत आढळून आली होती. ललिता कायी कुमार एस. असं या महिलेचं नाव असून सध्या तिच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. ललिता कायी कुमार एस. ही महिला मूळ अमेरिकन असून सध्या तामिळनाडूमध्ये वास्तव्यास होती.


सदर घटनेबाबत पोलीसांकडून तपास सुरु आहे. याचदरम्यान एक महत्वाची माहिती समोर आली आहे. कायी कुमार एस. ही उच्चशिक्षित असून ती योगाचे शिक्षण घेण्यासाठी दहा वर्षांपूर्वी भारतात तामिळनाडू येथे आली होती. त्यापूर्वी काय कुमार एस. ही अमेरिकेत प्रसिद्ध बॅले डान्सर व योग शिक्षक होती. या महिलेने कागदावर इंग्रजी भाषेतून आपल्यावर पतीने अत्याचार करून घातक औषधे दिली व जंगलात बांधून ठेवल्याची माहिती दिली होती.


महिलेकडून पतीचे नाव-


पोलिसांकडून प्राथमिक तपास म्हणून सदर महिलेला काही प्रश्न विचारले. यावेळी ती महिला हे कृत्य पतीकडून केले असं म्हणत होती. सतत ती पतीचेच नाव घेत होती. यावरुन पोलीस सध्या तिच्या कुटुंबियांविषयी माहिती घेत आहेत. 


नेमकं काय घडलं?


सदर महिलेच्या उजव्या पायाला साखळदंड घालून ते एका झाडाच्या बुंध्याला लॉक करण्यात आले होते. तीन दिवस उपाशी राहिल्याने ती महिला बोलण्याच्या स्थितीत नव्हती. सोनुर्लीतील काही गुराखी गुरे चारण्यासाठी जंगलात गेले असता त्यांना या महिलेचा आवाज आला. त्यानंतर त्या गुराख्यांनी पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी तिला साखळदंडातून सोडवून सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले असून पुढील तपास सुरू आहे. सदर महिला अनेक दिवस उपाशी असल्याने, तिला अन्न-पाणी न मिळाल्याने अत्यंत अशक्त झाली होती. उपचार सुरू झाल्यानंतर त्या महिलेने एका कागदावर लिहून तिच्या पतीवर आरोप केले आहेत. तिच्या पतीनेच जंगलात झाडाला साखळदंडाने बांधल्याचं तिने सांगितलं. तसेच गेल्या 40 दिवसांपासून ती त्या जंगलात होती असा दावा या महिलेने केला आहे.