सिंधुदुर्ग : जिल्ह्यातील रोणापालच्या जंगलात एका विदेशी महिलेला बांधून ठेवल्याच्या प्रकरणामध्ये आता धक्कादायक माहिती समोर आली आहे. आपल्या पतीनेच जंगलात बांधून ठेवलं असून गेल्या 70 दिवसांपासून आपण त्या अवस्थेत होतो असा दावा त्या महिलेने ( Sindhudurg Foreign Woman News ) केला आहे. अद्याप नीट बोलता येत नसल्याने त्या महिलेने कागदावर लिहून हा दावा केला आहे. ललिता कायी कुमार एस ( Lalita Kayi ) असं त्या महिलेचं नाव असून या प्रकरणाचा पोलिसांनी तपास सुरू केला आहे. 


सिंधुदुर्ग जिल्ह्यातील रोणापालच्या जंगलात विदेशी महिलेला साखळदंडाने बांधून ठेवण्यात आलं होतं. जंगलात गेलेल्या गुराख्यांमुळे ही घटना उघडकीस आल्यानंतर त्या महिलेवर सध्या ओरोस जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. 


गुराख्यांना आवाज आला आणि महिलेची सुटका


ही महिला मूळची अमेरिकेची असून ती सध्या तामिळनाडूमध्ये राहत असल्याची माहिती आहे. रोणापालच्या जंगलामध्ये गुराखी त्यांची जनावरे चरवण्यासाठी गेले असता त्यांना आवाज आला. त्या आवाजाच्या दिशेने ते गुराखी गेल्यानंतर एका झाडाच्या बुंध्याला त्या महिलेला बांधण्यात आल्याचं त्यांना दिसलं. बरेच दिवस अन्नपाण्याविना असलेल्या त्या महिलेची अवस्था अत्यंत बिकट होती. त्यामुळे तिच्याकडे पाहिल्यानंतर ते गुराखी घाबरून गेले. गुराख्यांनी याची माहिती लगेच पोलिसांनी दिली. 


पोलिसांनी त्या महिलेची साखळदंडातून मुक्तता केली आणि तिला सावंतवाडी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं. त्या महिलेची अवस्था इतकी बिकट होती की तिला काही बोलता येत नव्हतं. नंतर त्या महिलेला जिल्हा रुग्णालयात दाखल करून उपचार सुरू करण्यात आले.


पतीनेच साखळदंडाने बांधल्याचा आरोप


ती महिला अनेक दिवस उपाशी असल्याने, तिला अन्न-पाणी न मिळाल्याने अत्यंत अशक्त झाली होती. उपचार सुरू झाल्यानंतर त्या महिलेने एका कागदावर लिहून तिच्या पतीवर आरोप केले आहेत. तिच्या पतीनेच जंगलात झाडाला साखळदंडाने बांधल्याचं तिने सांगितलं. तसेच गेल्या 40 दिवसांपासून ती त्या जंगलात होती असा दावा तिने केला आहे. 


पतीने तिला एक इंजेक्शन दिलं, त्यामुळे तिचा जबडा उघडत नव्हता. त्यामुळे तिला काही बोलता येत नव्हतं आणि काहीही खाता येत नव्हतं. आता तिच्यावर उपचार सुरू आहेत.


त्या विदेशी महिलेने दावा केल्याप्रमाणे खरोखरच तिच्या पतीने तिला मरण्यासाठी जंगलात बांधून ठेवलं होतं का याचा तपास आता पोलिसांनी सुरू केला आहे. 


ही बातमी वाचा: 



  • Sindhudurg Crime : विदेशी महिलेला सिंधुदुर्गातील जंगलात साखळदंडाने बांधलं, गुराख्यानं पाहिलं अन् पोलिसांना सांगितलं