Sindhudurg News : सिंधुदुर्ग (Sindhudurg) जिल्ह्यातील दोडामार्ग तालुक्यातील तिलारी खोरे (Tilari Valley) हे जैवविविधतेने संपन्न असा भाग आहे. याच तिलारी खोऱ्यातील दोडामार्ग विजघर मार्गावर तिलारी येथे देव पाताडेश्वर मंदिराजवळ दुर्मिळ असा भारतीय तारा कासव (Indian Star Tortoise) आढळून आले. हे तारा कासव पाहण्यासाठी प्राणीमित्रांनी ठिकाणी गर्दी केली होती. हे तारा कासव कोनाळ येथील शिक्षिका गीतांजली सातार्डेकर यांनी आपल्या सोनावल येथील शाळेतून आपल्या निवासस्थानी कोनाळ येथे येत असताना पाहिले. त्यानंतर शेतकरी इस्माईल लोबो, इतिहास लोबो, जॉन्सन लोबो हे आपली गुरे आणण्यासाठी या परिसरात गेले होते. त्यावेळी त्यांना या कासवाबाबतची कल्पना त्यांनी वरील शेतकऱ्यांना दिली. त्यांनी कासव पाहिल्यानंतर आतापर्यंत पाहिलेल्या कासवांपेक्षा हा वेगळ्या जातीचा कासव असल्याचे त्यांच्या लक्षात आले.


दुर्मिळ तारा कासव सापडल्याची माहिती स्थानिकांनी दोडामार्ग मधील कोनाळ वनविभागाला दिली. वनपाल शिरवलकर, दत्ताराम मुकाडे, रामराव लोंढे घटनास्थळी दाखल होत हे तारा कासव वनविभागाच्या ताब्यात घेतला. यावेळी शेतकरी, ग्रामस्थ, प्राणीमित्र उपस्थित होते.




भारत आणि श्रीलंकेत हे तारा कासव आढळते. भारतात आंध्रप्रदेश, कर्नाटक, महाराष्ट्र, केरळ, तामिळनाडू, ओडिसा आणि पश्चिम बंगालमध्ये त्याचा अधिवास आहे. मात्र यांची संख्या खूपच कमी आहे. त्यामुळे ते दुर्मिळ प्रजाती असल्याची माहिती प्राणीमित्रानी दिली. मात्र सिंधुदुर्ग जिल्ह्यात यापूर्वी या तारा जातीचे कासव आढळलेले नाही. या कासवाबद्दल गैरसमज आणि अंधश्रद्धा आहे. हा कासव घरात ठेवल्यास घरात भरभराट अन् नोकरीधंद्यात प्रगती होते, अशी अंधश्रद्धा आहे. यामुळे या कासवांची मोठ्या प्रमाणात तस्करी होते. त्यामुळेच ही प्रजाती नष्ट होण्याच्या मार्गावर आहे.



भारत आणि श्रीलंकेच्या 'ड्राय झोन' मधील प्रदेशात हे कासव आढळून येतात. दक्षिण भारतामध्ये आढळणारे इंडियन स्टार कासवे ही वन्यजीव संरक्षण अधिनयानुसार संरक्षित असून त्यांची खरेदी विक्री करण्यास बंदी आहे. तसेच ती जवळ बाळगण्यास बंदी आहे. त्यामुळे तारा कासव वन्यजीव (संरक्षण) कायदा 1972 च्या अनुसूची अंतर्गत संरक्षित आहे. तेथे प्रजाती ताब्यात आढळल्यास त्याला सहा महिन्यांपर्यंतच्या कारावासाची शिक्षा होऊ शकते. विशेष म्हणजे या कासावाच्या पृष्ठभागावर तारे आणि कुबड्यासारखे फुगीर भाग असतात. त्यामुळे हा कासव इतर कासवांपेक्षा विशेष आहे. सध्या हे कासव वनविभागाच्या ताब्यात असून वनविभाग हे कासव या ठिकाणी कसं आलं याची माहिती घेत आहे.


इतर महत्त्वाच्या बातम्या