सिंधुदुर्ग : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील दोडामार्गमधील तिलारी खोऱ्यातील मोर्ले गावात हत्तींनी धुमाकूळ घातला आहे. मोर्ले गावात गेले तीन दिवस हत्तीचा मुक्काम असून गावातील केळी, काजू बागांचे मोठे नुकसान केले आहे. ऊर्जेवर कुंपण तोडून हत्तींनी केळीच्या आणि काजू बागेत येत नुकसान केले. काही ठिकाणी तर नारळ, पोफळीचे मोठ्या प्रमाणात नुकसान केले. तिलारी खोऱ्यात गेले तीन-चार महिने हत्ती नुकसान करत आहेत. वन विभाग फक्त पाहत आहे. हत्तीग्रस्त भागातील लोकांनी जगायचे कसे? हत्तीच्या भीतीने ग्रामस्थ घराबाहेर पडत नाहीत. घरात राहून संसाराचा गाडा कसा हाकायचा असे अनेक प्रश्न स्थानिकांना पडले असून वनविभाग मात्र बघ्याची भूमिका घेत आहे.
हत्तीच्या कळपाचा मुक्त संचार
दरम्यान काही दिवसांपूर्वीच तिलारीच्या खोऱ्यात पाच हत्तींच्या कळपाचा मुक्त संचार करत असतानाचा व्हिडीओ ग्रामस्थांनी त्यांच्या मोबाईल कॅमेऱ्यामध्ये कैद केला. या हत्तींच्या वावरामुळे ग्रामस्थ, शेतकरी भयभीत झाले आहेत. काही महिन्यांपूर्वी टस्कर, मादी आणि त्यांची तीन पिल्ले असा एकूण पाच हत्तींचा कळप केर, मोर्ले गावात दाखल झाला. शेती, फळ बागायती, सुपारी, माड जमीनदोस्त करत या हत्तींनी शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान केले. त्यांना आवश्यक असणारा मुबलक अन्नसाठा तेथे उपलब्ध असल्याने हे हत्ती येथे तळ ठोकून आहेत. हे हत्ती कधी केर तर कधी मोर्ले गावात मुक्त संचार करतात. तर तस्कर हत्तीमध्ये एकटा फिरतानाचा व्हिडीओ समोर आला आहे. त्यामुळे शेतकरी शेती करायची की नाही या विवंचनेत आहे.
कर्नाटकातून सिंधुदुर्गात येणाऱ्या रानटी हत्तींचा मार्ग रोखण्याबाबत अहवाल देण्याचे तत्कालीन मुख्यमंत्र्यांचे आदेश
कर्नाटक राज्यातून सिंधुदुर्गात येणाऱ्या रानटी हत्तींचे मार्ग कसे रोखता येतील, त्यासाठी काय उपाययोजना करावी लागेल त्याचा अहवाल दोन महिन्यांत देण्याचे आदेश तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी महिनाभरापूर्वी वनविभागाला दिले होते. त्याचबरोबर हत्तीबाधित गावातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना वाढीव स्वरुपात नुकसान भरपाई कशी देता येईल त्याचाही अहवाल देण्याचे आदेश दिले होते. कर्नाटकातील रानटी हत्ती हे दोडामार्ग तालुक्यातील केवळ मांगेली येथूनच नव्हे तर कोल्हापूर जिल्ह्यातील आजरा, चंदगड मार्गे देखील सिंधुदुर्गात येतात. सिंधुदुर्गातील दोडामार्ग तालुक्यामधील तिलारी खोऱ्यात हत्तीकडून हैदोस घातला जातो. तसेच हत्तीबाधित ज्या ज्या गावांमध्ये हत्तींकडून शेती बागायतीची नुकसानी होते, त्याची भरीव आणि वाढीव स्वरुपात भरपाई कशी देत येईल त्याचाही अहवाल देण्याचे आदेश देण्यात आले होते.