सिंधुदुर्ग:  जिल्ह्यातील मालवण-तळाशिल (Sindhudurg News)  येथील भर समुद्रात रविवारी रात्री पारंपारीक मच्छीमार आणि पर्ससीन मच्छीमार यांच्यात जोरदार हाणामारी झाली.  त्यात तिघे जखमी झाले असून, त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. फ्री स्टाईल हाणामारीनंतर (Fisherman Fighting in Sea)  काही वेळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.


बोटीवरील खलाशांना शिवीगाळ करत मारहाण केली आणि बोटीवरील साहित्य घेऊन गेल्याप्रकरणी तळाशिल येथील 25 जणांवर मालवण पोलिसांत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. तळाशील समुद्रात रात्रीच्या अंधारात मच्छीमारांच्या दोन गटात संघर्ष झाल्याची घटना घडली होती. यामध्ये सर्जेकोट येथील कृष्णनाथ तांडेल यांच्या चिन्मय प्रसाद व प्रथमेश लाड यांच्या 'पीर सुलेमान' या नौका समुद्रात मासेमारी करत असताना तळाशिल येथील काही मच्छीमारांनी दोन्ही बोटींवर चढत बोटीवरील खलाशांना शिवीगाळ करत मारहाण केली. तसेच बोटीवरील दोन मोबाईल सेट, वायरलेस सेट, दोन जी पी एस संच, दोन फिश फाइंडर, दोन बिनतारी संदेश यंत्रणा, बॅटरी तसेच मासेमारी साहित्य मिळून तीन लाख सत्तेचाळीस हजारांचा मुद्देमाल घेऊन गेले. 


25 जणांवर गुन्हे दाखल


या प्रकरणी मालवण पोलिसांत तळाशिल येथील 25 जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. त्यांच्यावर भादवी कलम 327,143, 147, 148, 149, 324, 323, 427, 504, 506 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला. याबाबत सहायक पोलिस निरीक्षक नितीन नरळे अधिक तपास करत आहेत. 


मासेमारी करण्याच्या हद्दीवरून वरून वाद


तसेच  मच्छिमारांमध्ये समुद्रात मासेमारी करण्याच्या हद्दीवरून वरून वाद आहे. मासेमारीच्या हद्दीवरून मच्छिमारांमध्ये अनेकदा  मारहाण  झाल्याच्या घटना घडल्या आहेत. मात्र त्यातून अद्याप तोडगा निघालेला नाही. एलईडी आणि बुल नेट मासेमारी ही बेकायदेशीर असूनही मच्छीमार मासेमारी करीत असल्याने याचा फटका पारंपरिक मासेमारी करणारया मच्छीमारांना बसत आहे. त्यामुळे भविष्यात बेकायदेशीर मासेमारी करणारयांवर मत्स्य विभाग काय कारवाई करणार याकडे लक्ष लागले आहे.


सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी मोठ्या संख्येने पर्यटक सिंधुदुर्ग जिल्ह्यात येणार आहेत.. त्यामुळे पर्यटन व्यावसायिक आणि स्थानिक मच्छिमार यांच्यातील वाद लवकरात लवकर मिटवून प्रशासनाने दोघांनाही योग्य प्रकारे आपला व्यावसाय करण्यास भाग पाडले तर पर्यटनाला चालना मिळेल सोबतच स्थानिक मच्छिमारांनाही रोजगार मिळेल.  


हे ही वाचा :


Nilesh Rane : 'माझ्या नेत्यावर माझा विश्वास', निवृत्तीचा निर्णय मागे घेतल्यानंतर निलेश राणेंची प्रतिक्रिया