सिंधुदुर्ग : 'मी टायगर नाही, मी राणे आहे', असं म्हणत निवृत्तीचा निर्णय मागे घेतल्यानंतर भाजपचे नेते निलेश राणे (Nilesh Rane) यांनी प्रतिक्रिया दिली. 'माझं जे काही मत होतं ते मी देवेंद्र फडणवीसांसमोर मांडलं आहे आणि माझ्या नेत्यावर माझा विश्वास आहे', असं देखील निलेश राणे यांनी म्हटलं. दोन दिवसांपूर्वीच निलेश राणे यांनी निवृत्तीचा निर्णय घेतला होता. पण त्यानंतर राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांची भेट घेतल्यानंतर त्यांनी त्यांचा निवृत्तीचा निर्णय मागे घेतला. दरम्यान त्यांनी निवृत्तीची निर्णय मागे घेतल्यानंतर त्यांच्या कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष केला. ठिकठिकाणी कार्यकर्त्यांनी टायगर इज बॅक अशा आशयाचे बॅनर लावले होते. झाराप येथे निलेश राणेंच्या स्वागतासाठी रॅली काढण्यात आली होती.
केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचे सुपुत्र असलेले निलेश राणे माजी खासदार राहिले आहेत. पण सिंधुदुर्ग रत्नागिरीच्या राजकारणात इतरांची जास्त ढवळाढवळ होत असल्यानं केल्या काही दिवसांपासून त्यांचे भाजपच्या नेत्यांसोबत खटके उडत होते. पण त्यानंतर भाजपच्या बड्या नेत्यांनी त्यांची मनधरणी केल्याचा प्रयत्न केल्याचं वृत्त समोर आले होते. त्याच पार्श्वभूमीवर उमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीनंतर निलेश राणेंनी त्यांचा निवृत्तीचा निर्णय मागे घेतला.
मी सामान्य कार्यकर्ता - निलेश राणे
मला जे काही बोलायचं होतं ते मी माझ्या कार्यकर्त्यांशी बोललो आहे. मला विश्वास आहे की चर्चेत ते झालं ते नक्कीच होईल. म्हणून मी तयारीला देखील लागलोय. मी एक सामान्य कार्यकर्ता आहे. मला जे वाटत होतं ते मी माझ्या नेत्यांना सांगितलं आणि माझ्या नेत्यांवर माझा विश्वास आहे, असं निलेश राणेंनी म्हटलं.
कुडाळ - मालवणमधील सर्व जागा जिंकू - निलेश राणे
येणाऱ्या काळामध्ये कुडाळ - मालवण आणि कोकणातील सर्व जागा नेत्यांच्या सांगण्यावरुन निवडून आणायच्या आहेत. त्याच अनुषंगाने मी काम सुरु केलय. त्यामुळे भाजपचा नक्की विजय होईल, असा विश्वास यावेळी निलेश राणे यांनी व्यक्त केला.
निवृत्ती घेताना निलेश राणेंनी काय म्हटलं ?
निलेश राणे यांनी निवृत्ती घेताना म्हटलं होतं की, मी सक्रिय राजकारणातून कायमचा बाजूला होत आहे, आता राजकरणात मन रमत नाही, इतर काही कारण नाही. मागच्या 19-20 वर्षामध्ये आपण सगळ्यांनी मला खूप प्रेम दिलं, कारण नसताना माझ्या सोबत राहिलात त्याबद्दल मी आपला खूप आभारी आहे. भारतीय जनता पक्षामध्ये खूप प्रेम भेटलं आणि BJP सारख्या एका उत्तम संघटनेत काम करण्याची संधी मिळाली त्या बद्दल मी खूप नशीबवान आहे.
मी एक लहान माणूस आहे पण राजकरणात खूप काही शिकायला मिळालं आणि काही सहकारी कुटुंब म्हणून कायमचं मनात घर करून गेले, आयुष्यात त्यांचा मी नेहमी ऋणी राहीन. निवडणूक लढवणं वगैरे यात मला आता रस राहिला नाही, टीका करणारे टीका करतील पण जिथे मनाला पटत नाही तिथे वेळ स्वतःचा आणि इतरांचा वाया घालवणे मला पटत नाही. कळत नकळत मी काही लोकांना दुखावलं असेल त्याबद्दल दिलगिरी व्यक्त केली आहे.
हेही वाचा :
Nilesh Rane : आधी तडकाफडकी राजकीय निवृत्ती, आता निर्णय बदलला, निलेश राणेंच्या मनात नेमकं काय?