Sindhudurg News : महाराष्ट्राची चेरापुंजी म्हणून ओळख असलेल्या सिंधुदुर्गच्या (Sindhudurg) आंबोली घाट (Amboli Ghat) हा मृतदेह फेकण्याचं ठिकाण बनला आहे. आंबोली घाटामध्ये मुख्य धबधब्यापासून चार किलोमीटर अंतरावर दोनशे फूट खोल दरीमध्ये अज्ञात पुरुषाचा मृतदेह सापडला आहे. सावंतवाडी पोलीस तसेच आंबोली पोलीस यांच्या मार्गदर्शनाखाली आंबोली रेस्क्यू टीम हा मृतदेह बाहेर काढण्यासाठी रेस्क्यू ऑपरेशन करत आहे. 


सावंतवाडीहून चौकुळ इथे परत येणाऱ्या एका गावकऱ्याला आंबोली घाटातील दरड कोसळलेल्या ठिकाणी काल रात्री सातच्या सुमारास दरीत एक मृतदेह अडकलेल्या स्थितीत आढळला. गावकऱ्याने याची माहिती आंबोली पोलिसांना दिली. पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत तिथली पाहणी केली. मृतदेह अडकलेल्या स्थितीत असल्याने आंबोली रेस्क्यू टीमला पाचारण करण्यात आलं. परंतु दरीचा भाग खोल आणि धोकादायक असल्याने तसंच रात्र झाल्याने रेस्क्यू ऑपरेशन बुधवारी (21 जून) रोजी करण्याचं ठरवलं. त्यानुसार आज सकाळी मृतदेह बाहेर काढण्याच्या मोहिमेला सुरुवात झाली आहे. यानंतरच मृतदेह कोणाचा आहे, किती दिवसांपूर्वी मृत्यू झाला होता तसंच मृतदेह दरीत कसा आला याचा शोध घेतला जाईल.


अपघात की घातपात?


आंबोली पोलिसानी अंधार असल्याने मृतदेह काढण्याची मोहीम सकाळी राबवणार असल्याची माहिती दिली होती. त्यानुसार आज सकाळी मृतदेह बाहेर काढण्याचं काम सुरु झालं आहे. हा मृतदेह आढळल्यानंतर अपघात की घातपात संशय व्यक्त होत आहे. वर्षा पर्यटनाच्याआधी आंबोली घाटामध्ये मृतदेह मिळाल्याने स्थानिकामध्ये भीतीचं वातावरण आहे. 


याआधी दोन मृतदेह याच ठिकाणी फेकले


दरम्यान या अगोदरच्या दोन प्रकरणात मृतदेह याच ठिकाणी आणून खोल दरीत फेकले होते. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आंबोली हे जगभरातील पर्यटकांना वर्षा पर्यटनासाठी भुरळ घालणारं ठिकाण आहे. मात्र, अलीकडे पर्यटनाच्या दृष्टीने कमी मात्र मृतदेह फेकण्याचं ठिकाण म्हणून आंबोलीची ओळख बनू लागली आहे. अशा घटना थांबवण्यासाठी पोलीस प्रशासनाने तात्काळ पावले उचलावीत अशी मागणी पर्यटक आणि स्थानिकांमधून जोर धरत आहे. 


हेही वाचा


आंबोली घाटात खोल दरीत युवक कोसळल्याचा बनाव उघड, मृतदेहाची विल्हेवाट लावताना आरोपीचा मृत्यू