सिंधुदुर्ग : आदित्य ठाकरेंच्या (Aaditya Thackeray) कोकण दौऱ्यावर भाजपचे खासदार निलेश राणे (Nilesh Rane) यांनी टीकास्त्र डागल्याचं पाहायला मिळतंय. 'आधी आदित्य ठाकरे जाहीर सभा घ्यायचे, त्यानंतर ते कॉर्नर सभा घ्यायला लागले. आता ते थेट खळ्यात आलेत, यानंतर कुठे जातील याचा अंदाज तुम्हीच घ्या', अशा शेलक्या भाषेत निलेश राणेंनी आदित्य ठाकरेंच्या खळा बैठकीवर टीका केलीये. 'ठाकरे कुठे होते आणि कुठे आलेत, त्यांची काय अवस्था झालीये. माझ्या त्यांच्या या प्रवासाला शुभेच्छा' असा खोचक टोला देखील निलेश राणेंनी लगावला आहे.
आदित्य ठाकरेंनी त्यांच्या कोकण दौऱ्यामध्ये खळा बैठका घेतल्या. कोकणात आदित्य ठाकरेंच्या या खळा बैठकांची उत्सुकता सर्वांनाच लागून राहिली होती. खळा म्हणजे शेणाने सारवलेलं अंगण. याच खळ्यात बसून आदित्य ठाकरेंनी बैठका घेतल्या. याच बैठकीवर भाजपचे खासदार निलेश राणे यांनी टीका केलीये.
आदित्य ठाकरेंचं सरकारवर टीकास्त्र
ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांनी त्यांच्या कोकण दौऱ्यामध्ये सत्ताधाऱ्यांवर टीकास्त्र सोडलं. याच सरकारमुळे राज्यातील मोठे उपक्रम राज्याबाहेर गेले असल्याचा आरोप आदित्य ठाकरेंनी केला. विधानसभा अध्यक्ष जर संविधानानुसार गेले तर त्यांना सरकारला अपात्र ठरवावचं लागेल असे आदित्य ठाकरे म्हणाले. हे सरकार कायद्याने टिकू शकत नाही असे आदित्य ठाकरे म्हणाले. हे सरकार महाराष्ट्रासाठी कधीही दिल्लीला गेले नसल्याचे ठाकरे म्हणाले.
राऊत रिकामटेकडे असल्यामुळे रोज व्हिडिओ शोधत असतात - निलेश राणे
पिक्चर अभी बाकी है, संजय राऊतांकडून बावनकुळेंचा मकाऊतील 6 सेकंदाचा व्हिडीओ शेअर करण्यात आला. यावर देखील निलेश राणेंनी चोख प्रत्युत्तर दिलंय. संजय राऊत रिकामटेकडे असल्यामुळे रोज व्हिडिओ शोधत असतात. त्यांचाच एक दिवस पिक्चर येईल. त्यांची जी भानगड आहे, स्वतःच किती झाकून ठेवलं ते येणाऱ्या काळात आम्ही दाखवू शकतो. पण राजकारणात काही लोकांनी मर्यादा ठेवायला पाहिजे. संजय राऊत ही व्यक्ती मर्यादा न ठेवणारी आहे. येणाऱ्या काळात त्यांचेही व्हिडिओ निघतील त्यावर दुसऱ्यांवर बोट दाखवून काय फायदा नसेल. पण संजय राऊत आता व्हिडीओ पार्लर चालवल्या सारखं काम करतात. राज्यसभेच्या खासदारांकडून महाराष्ट्राला दिशा मिळेल अशी जी अपेक्षा असते ती त्यांच्याकडून नाही. अजून काही व्हिडीओ बघायचे असतील तर त्यांना आम्ही पाठवण्याची व्यवस्था करू, असं म्हणत राऊतांनी देखील निलेश राणेंनी टोला लगावलाय.