Aaditya Thackeray Konkan Visit : रत्नागिरी : आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) आजपासून दोन दिवस कोकण दौऱ्यावर (Konkan Visit) आहेत. काल रात्रीच ते कोकण दौऱ्यासाठी रवाना झालेत. ठाकरे गटाची (Thackeray Group) ताकद वाढवण्यासाठी तळागाळातील कार्यकर्त्यांशी ते संवाद साधणार आहेत. त्यासाठी ते कार्यकर्ते आणि  पदाधिकाऱ्यांसोबत खळा बैठक घेणार आहेत. या दौऱ्यात आदित्य ठाकरे रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि रायगड जिल्ह्यात बैठका घेणार आहेत.


आदित्य ठाकरेंची कोकणात 2 दिवस 'खळा बैठक'


आजपासून दोन दिवस म्हणजेच, 23 आणि 24 नोव्हेंबर 2023 आदित्य ठाकरे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील दोडामार्ग ते रायगड जिल्ह्यातील नागोठणे या दरम्यान दौरा करणार आहेत. यावेळी ते कार्यकर्त्यांसोबत खळा बैठकीमध्ये सहभागी होणार आहे. त्यांच्याशी संवाद साधणार आहेत. कोकण पदवीधर मतदार संघाच्या निवडणुकीबाबत हा दौरा असला तरी आगामी विधानसभा निवडणुकांची देखील यातून पेरणी केली जात असल्याचं जाणकार सांगतात. कोणतीही जाहीर सभा न घेता तळागाळातल्या कार्यकर्त्यांसोबत आदित्य ठाकरे संवाद साधणार असल्यामुळे त्यांच्या या दौऱ्याला आणि खळा बैठकीला महत्त्व प्राप्त झाले आहे.


खळा बैठक म्हणजे काय? 


घरासमोर असणाऱ्या अंगणाला कोकणात खळा असं म्हणतात. गावातील, घरातील किंवा वाडीतील कोणताही निर्णय असला तरी तो अंगणामध्ये म्हणजेच, खळ्यात बसून एकमुखी घेतला जातो. त्यामध्ये प्रत्येकाचं मत विचारात घेऊन निर्णय घेतला असतो. 


कोकणात आदित्य ठाकरेंच्या दौऱ्यासाठी जय्यत तयारी 


शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे आमदार आणि युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे आजपासून दोन दिवसीय कोकण दौऱ्यावर आहेत. हा दौरा सिंधुदुर्ग जिल्ह्यातील दोडामार्गपासून सुरू होणार आहे. यात खळा बैठकांचं आयोजन करण्यात आलं आहे. यात खळा (अंगण) शेणानं सारवलेली जमीन आणि त्यावर रांगोळी काढून सजवलं आहे. या अंगणात खाली बसून या बैठका घेतल्या जाणार असल्यानं एक कुतूहल शिवसैनिकांमध्ये आहे. त्यासोबत आदित्य ठाकरे यांना मालवणी खाद्य पदार्थ बनवून महिला कार्यकर्त्या त्यांचं आगळ्या वेगळ्या पद्धतीनं स्वागत करण्यासाठी तयार आहेत. 


कोणतीही जाहीर सभा न घेता तळागाळातल्या कार्यकर्त्यांसोबत आदित्य ठाकरे संवाद साधणार असल्यामुळे त्यांच्या या दौऱ्याला आणि खळा बैठकीला महत्त्व प्राप्त झाले आहे.कोकणातील तळागाळातील कार्यकर्त्यांपर्यंत जनसामान्यांपर्यंत पोहोचण्यासाठी आदित्य ठाकरे उद्यापासून दोन दिवस खळा बैठका घेणार आहेत. या खळा बैठकांमध्ये अगदी अंगणात बसून कार्यकर्त्यांशी पदाधिकाऱ्यांशी आणि कोकणवासीयांशी आदित्य ठाकरे संवाद साधतील. रत्नागिरी सिंधुदुर्ग आणि रायगड या तिन्ही जिल्ह्यांमध्ये या खडा बैठका घेण्यात येणार आहेत. गुरुवारी दोडा मार्ग ते सावंतवाडी, सावंतवाडी ते कुडाळ, कुडाळ ते बांबार्डे, बांबार्डे ते कणकवली, कणकवली ते राजापूर, राजापूर ते करबुडे असा आदित्य ठाकरेंचा दौरा असेल तर शुक्रवारी चिपळूण ते खेड, खेड ते महाड, महाड ते नागोठणे असा दौरा करत ठीक ठिकाणी या खळा बैठका घेतल्या जातील