मुंबई : माजी खासदार निलेश राणे (Nilesh Rane) यांनी आपला राजकीय निवृत्तीचा निर्णय 24 तासात मागे घेतला आहे. भाजप नेते आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण (Ravindra Chavan) यांनी आजच निलेश राणे यांची भेट घेऊन समजूत काढली होती. रवींद्र चव्हाण यांच्यासोबतच्या मतभेदामुळे निलेश राणे यांनी सक्रिय राजकारणातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला होता. मात्र रवींद्र चव्हाण आणि देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यासोबत निलेश राणे यांची चर्चा झाली. त्यानंतर रवींद्र चव्हाण आणि निलेश राणे यांनी दोघांनी मिळून पुढील निवडणुकीच्या तयारीला लागण्याच्या सूचना देवेंद्र फडणवीसांनी दिल्या होत्या. त्यानुसार आता निलेश राणे यांनी आपला निर्णय बदलत, राजकारणात सक्रिय राहण्याची भूमिका घेतली आहे.


24 तासात निवृत्तीचा निर्णय मागे


भाजप नेते निलेश राणे यांनी बुधवारी एक ट्विट करत आपण अचानक राजकारणातून बाजूला होत असल्याचं जाहीर केलं होतं. त्यानंतर राजकारणात उलट सुलट चर्चा सुरू होत्या. राज्याचे मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या कार्यपद्धतीमुळे निलेश राणे बाजूला होत असल्याची चर्चा होती. आज रवींद्र चव्हाण आणि देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीनंतर निलेश राणे यांनी राजकारणातून निवृत्त होण्याचा निर्णय 24 तासांमध्ये मागे घेतला. 


रवींद्र चव्हाण निलेश राणेंची भेट घेतल्यानंतर म्हणाले, "निलेश राणे यांनी ट्विट केल्यानंतर नेमकं काय घडलं हे कळत नव्हतं. आम्ही याबाबत नारायण राणे (Narayan Rane) यांच्यासोबत चर्चा केली आणि त्यानंतर देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यासोबत चर्चा करण्यात आली. संघटनेत काम करत असताना कार्यकर्त्यांवर अनन्या होऊ नये ही सर्वांची भावना आहे."


भाजप आमदार प्रमोद जठार यांची प्रतिक्रिया


निलेश राणेंनी आपला निवृत्तीचा निर्णय मागे घेतल्यानंतर भाजप आमदार प्रमोद जठार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हमाले की, "ज्या काही घडामोडी घडल्या आणि त्यातून त्यांच्या मनात काही नव्हतं असं लक्षात आलं. देवेंद्र फडणवीस, रवींद्र चव्हाण आणि निलेश राणे यांची भेट झाली. ते आनंदी आहेत, त्यांनी कामाला सुरुवात केली म्हणून आम्ही आनंदी आहोत. असं अचानक राजकारणाच्या बाहेर जाणार त्यांना परवडणार नाही,  कोकणाच्या विकासाला परवडणारं नव्हतं. सिंधुदुर्ग असेल रत्नागिरी असेल किंवा तळकोकण असेल, निलेश राणे यांच्या बुलंद आवाजाची आम्हाला गरज आहे. त्यांनी निर्णय मागे घेतला आहे आम्हाला आनंद आहे की त्यांनी निर्णय मागितला. त्यांनी निवृत्त होऊ नये हे आमचं मत होतं आणि त्याच हिशोबाने आज घडलं."


ही बातमी वाचा: