सिंधुदुर्ग शिवसेना शिंदे (Shiv Sena Shinde) आणि ठाकरे गटाचा (Shiv Sena UBT) दसरा मेळावा (Dasara Melava) सुरू होण्याआधीच  आरोप-प्रत्यारोपांचे फटाके फुटू लागले आहेत. शिवाजी पार्क मैदानाच्या (Shivaji Park) परवानगीवरून कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, यासाठी आम्ही अर्ज मागे घेत असल्याचे शिंदे गटाने म्हटले होते. मात्र, शिंदे गटाच्या या दाव्यावरच ठाकरे गटाचे खासदार विनायक राऊत (Vinayak Raut) यांनी प्रश्न उभे केले आहेत. मुंबई महापालिकेत शिंदे गटाने मैदानासाठी दिलेल्या अर्जावरून सगळा गोलमाल बाहेर येईल, म्हणून त्यांनी माघार घेतली असल्याचा दावा खासदार विनायक राऊत यांनी केला आहे. शिंदे गटाकडून मेळाव्यातील गर्दीसाठी लोकांना व्यसनाधीन करण्याचा प्रयत्न सुरू असल्याची बोचरी टीका ही त्यांनी केली. 


शिवसेना ठाकरे गटाचे खासदार विनायक राऊत यांनी शिंदे गटावर जोरदार हल्लाबोल केला. त्यांनी म्हटले की, शिंदे गटाने शिवतीर्थावरील दसरा मेळावा घेण्याचा दावा सोडण्याशिवाय पर्याय नव्हता. त्यांनी मैदानासाठी केलेल्या अर्जातील गोलमाल समोर येऊन मुख्यमंत्री अडचणीत येतील म्हणूनच ते बाजूला झाल्याची टीका खासदार विनायक राऊत यांनी केली. 


मुंबईच्या आयुक्तांनी मुख्यमंत्र्यांना शिवतीर्थावर दसरा मेळावा घेण्यासाठी केलेला अर्ज मागे घेण्यासाठी सांगितले होते, असा गौप्यस्फोटही राऊत यांनी केला. ठाकरे गटाने अगोदर अर्ज केला होता. मात्र शिंदे गटाने उशिरा अर्ज करून देखील तो अर्ज अगोदर केल्याचं दाखवलं आणि त्या आधारे ते दावा करत होते. मात्र ही सर्व बाब माहिती अधिकारातून समोर आल्याने मुख्यमंत्री आणि मुंबईचे पालिका आयुक्त, प्रशासक अडचणीत येणार हे दिसताच शिंदे गटाने शिवतीर्थावर दसरा मेळावा घेण्यासाठी केलेला अर्ज मागे घेऊन दावा सोडला असे राऊत यांनी म्हटले. 


शिंदे गटाने आपलं अस्तित्व पैसा आणि बेईमानीवर उभं केलं आहे. त्यामुळे पोपटपंची करणाऱ्या नेत्यांच्या मेळाव्याला लोकांनी कशी पाठ फिरवली हे या अगोदरच्या मेळाव्यांत दिसले आहे. त्यामुळे त्यांनी ठाकरेंच्या दसरा मेळाव्याशी तुलना करू नये. तसेच शिंदे गटाचे मेळावे म्हणजे लोकांना व्यसनी बनवायचे असल्याची खरमरीत टीका खासदार विनायक राऊत यांनी शिंदे गटावर केली आहे. 


दसरा मेळाव्याची तयारी अंतिम टप्प्यात


शिवसेना ठाकरे गटाकडून शिवतीर्थावर येणाऱ्या हजारो शिवसैनिकांसाठी विशेष नियोजन करण्यात आलं आहे. नियोजनाची जबाबदारी ठाकरे गटाचे राज्यातील संपर्कप्रमुख जिल्हाप्रमुख आणि मुंबईतील विभाग प्रमुख यांना देण्यात आली आहे. अधिकाधिक शिवसैनिकांनी रस्त्यावरील वाहतूक कोंडी टाळण्यासाठी रेल्वेने दसरा मेळाव्याला येण्याचं आवाहन ठाकरे गटाकडून करण्यात आलं आहे. राज्यभरातील तळागाळातील शिवसैनिकांनी दसरा मेळाव्याला शिवतीर्थावर येण्याची इच्छा व्यक्त केल्याने त्यांना शिवतीर्थापर्यंत आणण्यासाठी सहकार्य करण्याची जबाबदारी त्या-त्या जिल्ह्यातील संपर्कप्रमुख आणि जिल्हाप्रमुखांना देण्यात आली आहे.


इतर महत्त्वाच्या बातम्या :