छत्रपती संभाजीनगर :  शिवसेनेत एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी बंडखोरी केल्यानंतर आता शिवसेना शिंदे गटाचा (Shiv Sena Shinde Faction) यंदा दुसरा दसरा मेळावा (Dasara Melava) होणार आहे. निवडणूक आयोगाने मूळ शिवसेना नाव आणि निवडणूक चिन्ह धनुष्यबाण एकनाथ शिंदे यांच्या गटाला दिल्यानंतरचा पहिलाच दसरा मेळावा (Dasara Melava) असणार आहे. त्यामुळे शिंदे गटाकडून मोठी तयारी सुरू आहे. हिंदुत्ववादी विचारांचा वारसा सांगणारा आमचा दसरा मेळावा खरा असल्याचा दावा शिंदे गटाने केला आहे. ठाकरे गटाने हिंदुत्ववादी विचार सोडल्याची टीका शिंदे गटाकडून करण्यात आली आहे. शिंदे गटाच्या दसरा मेळाव्यातील हिंदुत्ववादी विचारांचे सोने लुटण्यासाठी राज्याचे मंत्री अब्दुल सत्तार यांनी मोठी तयारी केली आहे. 


दसरा मेळाव्याच्या तयारीच्या बैठकीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गर्दी जमवण्यासाठी दिलेले लक्ष्य पूर्ण करण्यासाठी शिंदे गटाचे मंत्री, आमदार यांनी कंबर कसली आहे. छत्रपती संभाजीनगरमधील आमदार आणि राज्याचे मंत्री अब्दुल सत्तार यांनीदेखील दसरा मेळाव्यासाठी मोठी गर्दी जमवण्यासाठी कंबर कसली आहे. दसरा मेळाव्यासाठी अब्दुल सत्तार यांनी एसटी महामंडळाच्या 200 बसेस आरक्षित केल्या आहेत. यामध्ये छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातून 150, जालनातून 50 बसेस आरक्षित करण्यात आल्या आहेत. एसटी महामंडळाने अब्दुल सत्तार यांना 55 रुपये प्रतिकिमी या दराने एसटी दिल्या आहेत. 


गतवर्षी  शिंदे गटाच्या दसरा मेळाव्यात मोठी गर्दी झाली होती. ही गर्दी ग्रामीण भागातून मुंबईत नेण्यासाठी मोठ्या प्रमाणावर एसटी बसेस बुक करण्यात आल्या होता. एवढ्या बस कशा बुक केल्या, कुणी बुक केल्या, याची चौकशी करण्याची मागणी विरोधकांनी केली होती .एवढे पैसे आणले कुठून हे देखील तपासण्याची मागणी केली होती. त्यानंतर आता पुन्हा एकदा मोठ्या प्रमाणावर एसटी बसेस बुक करण्यात येत आहे. 


सभेसाठी गर्दीचे लक्ष्य 


शिंदे गटाकडून दसरा मेळाव्यासाठी विविध पदाधिकाऱ्यांवर जबाबदारी सोपवली आहे. त्यानंतर आता सभेसाठी गर्दी जमवण्याचे आव्हान शिंदे गटासमोर आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सभेसाठी प्रत्येक जिल्हा प्रमुखाने किमान 5000 कार्यकर्ते, नागरिकांना सभेसाठी आणण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे शिंदे गटाकडून यंदाच्या दसरा मेळाव्यासाठी किमान पावणे दोन लाख ते दोन लाख गर्दी जमवण्यावर भर असणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. 



शिवाजी पार्कात ठाकरेंचा आवाज घुमणार 


दरम्यान दरवर्षी प्रमाणे यंदाच्या वर्षात देखील ठाकरे गटाचा दसरा मेळावा शिवाजी पार्कात होणार आहे. त्यामुळे यंदा देखील शिवाजी पार्क मैदानात ठाकरेंचाच आवाज घुमणार आहे. मागील वर्षी देखील मैदानावरुन वाद निर्माण झाला होता. पण त्यावेळी देखील ठाकरेंनाच दसरा मेळाव्यासाठी शिवाजी पार्काचं मैदान मिळालं होतं. तर शिंदेंच्या शिवसेनेने बीकेसीच्या मैदानावर दसरा मेळावा घेतला होता. पण यंदा बीकेसीच्या मैदानावर अनेक कामं सुरु असल्याचे शिंदेंना दसरा मेळावा तिथे घेणं शक्य नव्हतं.