सिंधुदुर्ग: खासदार नारायण राणे यांनी केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांची त्यांच्या नवी दिल्ली येथील निवासस्थानी भेट घेतली आहे. या भेटीत मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाचे राहिलेले काम गणपतीपर्यंत पूर्ण व्हावे, अशी मागणी  नारायण राणे (Narayan Rane) यांनी केली.  तसेच पत्रादेवी ते राजापूर भागाचे सुशोभीकरण पूर्ण व्हावे, अशी विनंतीही त्यांनी नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांच्याकडे केली. नारायण राणे यांनी खासदार  झाल्यानंतर मुंबई-गोवा महामार्गाच्या (Mumbai Goa Highway) चौपदरीकरणाच्या रखडलेल्या कामात लक्ष घातले आहे. यंदा 7 सप्टेंबरला गणेश चतुर्थी (Ganpati Utsav 2024) आहे. याच दिवशी कोकणातील घराघरांमध्ये लाडक्या बाप्पाचे आगमन होणार आहे. त्यापूर्वी मुंबई आणि आजुबाजूच्या परिसरातून लाखो चाकरमनी हे कोकणात जातात. त्यापूर्वी मुंबई-गोवा महामार्गाचे रखडलेले काम पूर्ण व्हावे, अशी मागणी नारायण राणे यांनी गडकरी यांच्याकडे केली.


नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत नारायण राणे हे रत्नागिरी-सिंधुदुर्ग मतदारसंघातून निवडून आले होते. त्यांनी ठाकरे गटाच्या विनायक राऊत यांचा पराभव केला होता. लोकसभा निवडणुकीच्या प्रचारावेळी नारायण राणे यांनी कोकणचा विकास करण्याचा शब्द मतदारांना दिला होता. त्यानुसार आता नारायण राणे हे कामाला लागले असून त्यांनी सर्वप्रथम मुंबई-गोवा महामार्गाच्या मुद्द्याला हात घातल्याचे दिसत आहे. 


गणपतीपूर्वी मुंबई-गोवा महामार्गाचे काम पूर्ण होणार का?


मुंबई-गोवा महामार्गाचे काम गेल्या अनेक वर्षांपासून रखडले आहे. गणपती आणि शिमग्यासाठी मुंबई, ठाणे, नवी मुंबईतील अनेक चाकरमनी कोकणात आपापल्या गावी जातात. यासाठी चाकरमनी रेल्वे आणि रस्ते वाहतुकीवर अवलंबून असतात. यापैकी कोकण रेल्वेच्या गणपती स्पेशल गाड्यांचे बुकिंग हे लगेच हाऊसफुल्ल होते. त्यामुळे बहुतांश कोकणवासियांना रस्तेमार्गेच आपले गाव गाठावे लागते. मात्र, यामध्ये मुंबई-गोवा महामार्गाची दुरावस्था हे प्रमुख विघ्न आहे. गेल्या काही वर्षांमध्ये पावसाळ्याच्या काळात मुंबई-गोवा महामार्गावरील रस्त्यांची होणारी चाळण आणि खड्डे यामुळे कोकणवासियांनी प्रचंड त्रास सहन केला आहे. देशात एकीकडे अवाढव्य रस्ते प्रकल्प आकाराला येत असताना कोकणवासियांची मुलभूत गरज असणारा मुंबई-गोवा महामार्ग चांगला का होत नाही, या यक्षप्रश्न अनेक वर्षे कायम आहे. त्यामुळे आता नारायण राणे हे खासदार झाल्यानंतर तरी मुंबई-गोवा महामार्गाचा प्रश्न मार्गी लागणार का, हे पाहावे लागेल. केंद्रीय रस्ते व वाहतूक मंत्री नितीन गडकरी त्यादृष्टीने काय पावलं उचलणार, हे पाहावे लागेल. 


आणखी वाचा


मुंबई - गोवा महामार्गावरील परशुराम घाटातील रस्त्याला मुसळधार पावसाचा फटका; कडेला टाकलेला भराव खचला