Konkan Rain News : कोकण किनारपट्टीवर (Konkan coastal ) कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला असून पुढील दोन ते तीन दिवस कोकण किनारपट्टी भागात मुसळधार पाऊस (Heavy rain) कोसळणार असल्याचा इशारा हवामान विभागानं व्यक्त केला आहे. तर सिंधुदुर्गात (Sindhudurg) अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्याला आज ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. सध्या जिल्ह्यात सर्वच भागात पावसाची संततधार सुरु आहे. सिंधुदुर्गला रात्रभर पावसाने झोडपून काढले आहे. आता मात्र पावसाची संततधार सुरु आहे.


गेल्या 24 तासात सिंधुदुर्गमध्ये मुसळधार पाऊस


सिंधुदुर्ग जिल्ह्यात गेल्या 24 तासात सर्वाधिक पाऊस कणकवली तालुक्यात 91 मी.मी. झाला आहे.  सावंतवाडी, मालवण, कुडाळ तालुक्यात सरासरी 65 मी. मी. पावसाची नोंद झाली आहे. जिल्ह्यात पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे सकल भागात पाणी साचलं आहे. पावसाचा सर्वाधिक जोर हा सह्याद्रीच्या खोऱ्यात असून सह्याद्रीच्या खोऱ्यातून वाहणाऱ्या कर्ली नदी, गडनदी, तेरेखोल नदी या नद्या दुतडी भरून वाहत आहेत. सध्या समुद्र खवळलेल्या स्थितीत असून मच्छीमारांनी खोल समुद्रात जाऊ नये असा इशारा देखील देण्यात आला आहे.


रायगड जिल्ह्यातही मुसळधार पावसाची नोंद 


रायगड जिल्ह्यातील अलिबाग, म्हसळा, श्रीवर्धन, मुरुड, माथेरान सुधागड, खालापूर, पोलादपूर, रोहा तालुक्यांत सर्वाधिक पाऊस झाला आहे. रायगडमध्ये काल 410.40 मिमी तर आज 468.58 मिमी पावसाची नोंद झाली आहे. छोटे मोठे धबधबे वाहू लागलेत. पर्यटकांचं आगमन होण्याची शक्यता आहे. या पावसामुळं भात लावणीच्या कामांना वेग येणार आहे.  सध्या नदी, नाले, तुडुंब भरुन वाहू लागलेत. 


आज राज्यात कसं असेल हवामान?


हवामान विभागानं दिलेल्या माहितीनुसार आज कोकणात मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. कोकणातील रायगड आणि रत्नागिरी या दोन जिल्ह्यांना पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. त्यामुळं या भागात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर नागरिकांनी योग्य ती खबरदारी घ्यावी असं आवाहन प्रशासनाच्या वतीनं करण्यात आलं आहे. दरम्यान, पश्चिम महाराष्ट्रातील पुणे आणि सातारा या दोन जिल्ह्यांना पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. तसेच सिंधुदुर्ग जिल्ह्यात देखील पावसाचा यलो अलर्ट जारी केला आहे. त्याचबरोबर मुंबईसह ठाण्यात देखील पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आल्याची माहिती हवामान विभागानं दिली आहे. त्याचबरोबर मराठवाड्यातील काही जिल्ह्यांसह विदर्भात देखील आज पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.


महत्वाच्या बातम्या:


राज्यात आज कसं असेल हवामान? कुठं कुठं पडणार पाऊस? वाचा हवामान विभागाचा अंदाज