Shivaji Maharaj statue : मालवण येथील राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराज  पुतळा (Shivaji Maharaj statue) दुर्घटना प्रकरणी अजून एका आरोपीला उत्तर प्रदेश मिर्जापुर येथून अटक करण्यात आली आहे. पुतळ्याच्या जोडणीचे काम करणाऱ्या परमेश्वर रामनरेश यादव याला मिर्जापुर उत्तर प्रदेशमधून अटक करण्यात आली आहे. गुन्ह्याच्या तपासामध्ये त्याचा सहभाग असल्याचे निष्पन्न झाल्याने संशयित आरोपीला अटक केली आहे. आरोपीला मालवण दिवाणी न्यायालयात हजर केले असता तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.


पुतळ्याच्या वेगवेगळ्या भागांची जोडणी करताना निकृष्ट दर्जाचे काम  केल्याने गंज लागून पुतळा कोसळण्याची दुर्घटना घडल्याचे तांत्रिक तपासामध्ये निष्पन्न झाले आहे. त्यामुळं याप्रकरणी  तिसऱ्या आरोपीला अटक करण्यात आली आहे. राजकोट किल्यावर उभारण्यात आलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा अवघ्या आठ महिन्यात कोसळल्यानंतर शिवभक्तांच्या संपूर्ण महाराष्ट्रात आणि देशभरात तीव्र भावना उमटल्या होत्या. अखेर राज्य शासनाने राजकोट किल्लावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची रचना, अभियांत्रिकी, बांधकाम, उभारणी, संचलन आणि देखभाल दुरुस्ती करण्याची निविदा प्रसिद्ध केली आहे.


पुतळा अवघ्या आठ महिन्यांत पडल्याने पुतळ्याच्या दर्जाबाबत शंका निर्माण


गेल्यावर्षी नौदल दिनाच्या मुहूर्तावर पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi) यांच्या हस्ते राजकोट किल्ल्यावरील शिवरायांच्या पुतळ्याचे अनावरण करण्यात आले होते. मात्र, हा पुतळा अवघ्या आठ महिन्यांमध्ये कोसळला होता. जयदीप आपटेला इतके मोठे पुतळे उभारण्याचा अनुभव नसतानाही भारतीय नौदलाकडून त्याला हे काम देण्यात आले होते. जयदीप आपटे याला हा पुतळा उभारण्यासाठी 26 लाख रुपये मिळाले होते, असा दावा विरोधकांनी केला होता. उर्वरित चौथरा आणि आजुबाजूच्या कामासाठी कोट्यवधी रुपयांचा खर्च झाला होता. मात्र, हा पुतळा अवघ्या आठ महिन्यांत पडल्याने पुतळ्याच्या दर्जाबाबत शंका निर्माण झाल्या होत्या.


जयदीप आपटे पोलिसांच्या ताब्यात


राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा अवघ्या आठ महिन्यांपूर्वी उभारण्यात आला होता. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नौदल दिनाच्या दिवशी या पुतळ्याचे लोकार्पण केले होते. मात्र, 26 ऑगस्टला ब्राँझचा हा 28 फुटी पुतळा कोसळला होता. यानंतर राज्यभरात संतापाची लाट उसळली होती. पुतळा पडल्यानंतर जयदीप आपटे जवळपास 8 दिवस फरार होता. अखेर पोलिसांनी त्याला कल्याणमधील त्याच्या घराबाहेरुन आपटेला ताब्यात घेतले होते. आता यानंतर आज उत्तर प्रदेशातील एका आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे.