Maharashtra Politics : शिवसेना (Shiv Sena) आणि कोकण (Konkan) , कोकणी माणूस याचं एक वेगळं नातं आहे. बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) यांनी देखील ते कायम बोलून दाखवलं. ठाण्यात पहिल्यांदा शिवसेनेचा भगवा फडकला पण, त्यानंतर कोकणातील रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग (Sindhudurg) जिल्ह्यात देखील शिवसेनेची वाढ उत्तरोत्तर वाढत गेली. युतीच्या काळात दोन्ही मुख्यमंत्री कोकणातील होते. नारायण राणे (Narayan Rane) यांच्याबंडानंतर देखील कोकणी माणूस शिवसेनेचा मागे उभा राहिलेला दिसला. राणेंच्या बंडानंतर देखील काही काळ कठिण होता. पण, तो फार काळ टिकला नाही असं नक्कीच म्हणता येईल. मुळात कोकणी माणूस समाजवादाच्या मागे राहिलेला दिसून आला. यामध्ये बॅरिस्टर नाथ पै, मधु दंडवते या सारख्या नेत्यांनी नावं आवर्जुन घेता येतील. पण, नव्वदीनंतर हे चित्र देखील हळूहळू बदलू लागलं. ठाणे, मुंबई, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात शिवसेनेच्या भगव्याचा झंझावात वाढू लागला. मुंबई, ठाण्यात नोकरीनिमित्त येत असलेल्या कोकणी माणसानं देखील शिवसेनेच्या पाठिशी उभं राहण्याचा निर्णय घेतला. आजही कोकणातल्या एखाद्या गावाची ग्रामपंचायतीची निवडणूक असल्यास मुंबईचा चाकरमानी, शिवसैनिक येऊन इथं समीकरणं बदलण्याची ताकद ठेवतो. पण, याच शिवसेनेसाठी सध्याचा काळ कठिण आहे ही बाब नाकारता येणार नाही. कारण, रायगडमधील तीन, रत्नागिरी जिल्ह्यातील दोन आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील एक आमदार एकनाथ शिंदे यांच्यासोबत गेला आहे. अशा स्थितीत शिवसैनिकांमध्ये, कार्यकर्त्यांमध्ये गोंधळ न झाल्यास आश्चर्य वाटायला नको. यासंपूर्ण स्थितीची आढावा घेण्याचा, भविष्यातील स्थितीचा आखाडा बांधण्याचा आम्ही प्रयत्न केला. त्यासाठी काही रायकीय अभ्यासकांशी देखील बोललो. त्यावेळी एक गोष्ट मात्र स्पष्ट झाली कि चित्र दिसतंय त्यापेक्षा वेगळ्या घडामोडी देखील घडू शकतात. 


अर्थात या साऱ्याची सुरुवात उदय सामंत (Uday Samant) यांच्या मतदारसंघापासून केल्यास योग्य ठरू शकते. कारण, सामंत यांचं वैयक्तिक वेगळं असं प्रस्थ रत्नागिरी-संगमेश्वर मतदारसंघात दिसून येते. ठाकरे सरकारमध्ये मंत्री, आदित्य ठाकरे यांचे निकटवर्तीय म्हणून त्यांची ओळख. पण त्यांच्या जाण्यानं निश्चितच एक धक्का शिवसेनेला बसला. शिवसेना खासदार आणि सचिव असलेल्या विनायक राऊत यांनी त्यांच्यावर जोरदार टिका केली. गद्दार, उपरे अशी विशेषणं देखील सामंतांना लावली. त्यावरून एकंदरीत राजकीय स्थितीचा अंदाज येऊ शकेल. याबाबत तसेच रत्नागिरी - सिंधुदुर्ग लोकसभा मतदासंघाबाबत 'एबीपी माझा'नं सकाळचे रत्नागिरी जिल्ह्याचे निवासी संपादक शिरिष दामले यांच्याशी बातचित करत त्यांचं याबाबतचं मत जाणून घेतले. त्यावेळी बोलताना दामले यांनी ''सध्या शिवसेनेला फटका बसला आहे हि बाब मान्य करायला हवी. जिल्ह्याचा विचार केल्यास शिवसेना खिळखिळी झाली आहे हि बाब नाकारून चालणार नाही. कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम आहे. या साऱ्या बाबी असताना शिवसेनेच्या दुसऱ्या फळीतील नेते कुठं आहेत? निष्ठावंत म्हणून सांगितलं जात असताना ते कुठं दिसतात? असा सवाल केला. शिवाय रत्नागिरी - सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाचा विचार करायचा झाल्यास विनायक राऊत यांना येणारी निवडणूक सोपी असेल असं नक्कीच म्हणता येणार नाही. कारण, सामंत आणि राऊत यांच्या आलेलं राजकीय वितृष्ट पाहता गणितं नक्की बदलणार. तसेच सिंधुदुर्गामध्ये नारायण राणे गप्प बसतील अशी गोष्ट देखील नसणार आहे, अशी प्रतिक्रिया दिली. त्यानंतर मुद्दा येतो तो योगेश कदम यांचा. कारण, रामदास कदम यांचे पुत्र हे योगेश कदम. अनिल परब आणि कदम यांच्यातील वाद आणि त्यानंतर राजीनामा देत रामदास कदम यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या होत्या. त्यावेळी त्यांना अश्रु देखील अनावर झाले होते. याबाबत आम्ही खेड, दापोलीतील काही पत्रकार, जाणकारांशी देखील बोललो. त्यावेळी त्यांनी कदम यांच्या ताकदीकडे नजरअंदाज करून चालणार नाही. हा संपूर्ण मतदारसंघ दुर्गम असा होता. पण, मागील काही वर्षात रामदास कदमांनी केलेले प्रयत्न नाकारता येणार नाहीत. शिवाय, रामदास कदम यांचा संपर्क, त्यांची वैयक्तिक ताकद देखील नाकारता येणार नाही. अशावेळी शिवसेना नेमकी कुणाला तिकिट देणार? कार्यकर्त्यांमधील संभ्रम दूर किती लवकर करते? यावर साऱ्या गोष्टी अवलंबून असणार असल्याचं सांगितलं. मुख्यबाब म्हणजे काहिंनी तर अनिल परब आणि रामदास कदमांमध्ये झालेले वाद, पत्रकार परिषदांमध्ये झालेले आरोप - प्रत्यारोपांचा दाखल देत मंडणगड आणि दापोली नगरपंचायत निवडणुकीत राष्ट्रवादीला कसा फायदा झाला. याकडे देखील लक्ष वेधलं. त्यामुळे रत्नागिरी असो किंवा खेड - दापोली या ठिकाणी सामंत आणि कदम यांचा व्यक्ति म्हणून असलेला करिष्मा नाकारता येणार नाही असा सूर दिसून आला. पण, त्याचवेळी योग्य असा उमेदवार आणि आत्तापासून शिवसेनेनं या भागात लक्ष टाकल्यास किमान सध्याच्या घडीला एकतर्फी वाटणारी स्थिती बदलू शकते असा विश्वास देखील बोलून दाखवला. 
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडी - दोडामार्ग या मतदारसंघातील दिपक केसरकर देखील एकनाथ शिंदे गटात सामील झाले आहेत. सध्या केसरकर एकनाथ शिंदे गटाचे प्रवक्ते असून पत्रकार परिषदांमधून देखील एकनाथ शिंदे गटाची बाजु जोरदारपणे मांडताना दिसत आहेत. केसरकर यांची वेगळी अशी एक ताकद आहे. राष्ट्रवादीमधून दिपक केसरकर शिवसेनेत आले. पण, सध्या तरी त्यांच्याविरोधात कुणी सक्षम असा उमेवारपदाचा चेहरा दिसत नाही. त्यामुळे या ठिकाणची राजकीय स्थिती जाणून घेण्यासाठी 'एबीपी माझा'नं पुढारीचे जेष्ठ पत्रकार हरिश्चंद्र पवार यांच्याशी संवाद साधला. यावेळी बोलताना पवार यांनी 'सिंधुदुर्गातील सावंतवाडी मतदासंघांचे आमदार दिपक केसरकर यांनी बंडखोरी करत एकनाथ शिंदे गटात सामील झाल्याचा त्यांना फटका बसू शकतो. मात्र आगामी काळात ते विधानसभा निवडणुकीत न लढवता लोकसभा निवडणुकीत लढण्याची शक्यता त्यांनी बोलून दाखवली. सावंतवाडी मतदारसंघांत शिवसेनेचे मताधिक्य ठरलेलं असल्याने दिपक केसरकर यांना विधानसभा निवडणुकीत फटका बसू शकतो. मात्र एकनाथ शिंदे गट आणि भाजप एकत्रित आल्यास नारायण राणेंच्या माध्यमातून फायदा होणार आहे. त्यामूळे आगामी काळात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे कोणता उमेदवार रिंगणात उतरवणार? यावर गणितं अवलंबून असणार आहेत' अशी प्रतिक्रिया 'एबीपी माझा'शी बोलताना दिली. 


या साऱ्यांमध्ये रायगडमधील तीन मतदारसंघाकडे देखील दुर्लक्ष करून चालणार नाही. कारण कर्जत, अलिबाग आणि महाडमधील तीन आमदार एकनाथ शिंदे गटात सामील झाले आहे. त्यामुळे या ठिकाणची सद्याची राजकीय स्थिती जाणून घेण्यासाठी आम्ही राजकीय विश्लेषक संजय ठाकूर यांच्याशी संवाद साधला यावेळी त्यांनी 'सध्या संभ्रमावस्था कार्यकर्त्यांमध्ये दिसून येते. विशेषता तरूण शिवसैनिकांमध्ये. कारण, आमदार गेले पण, जिल्हाप्रमुख मात्र उद्धव ठाकरेंसोबत आहे. शिवाय, जो जुना शिवसैनिक बाळासाहेबांना मानत होता तो अद्याप देखील उद्धव ठाकरे यांच्या पाठिशी आहे. असं असलं तरी शेकाप अर्थात शेतकरी कामगार पक्षाकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. कारण, जिल्हा परिषद आणि पंचायत समितीत शेतकरी कामगार पक्षाचं प्राबल्य आहे. शेकाप हा मागील अडिच वर्षे महाविकास आघाडी सरकारच्या पाठिशी राहिला. असं असताना 2 ऑगस्ट रोजी शेकापचा मेळावा होईल. त्यानंतर त्यांची भूमिका कळू शकेल. अर्थात सेनेतील या दुफळीचा फायदा शेकाप किंवा ऱाष्ट्रवादीला देखील होऊ शकतो. पण, सध्या भाजप जिल्ह्याच्या दक्षिण भागात देखील लक्ष केंद्रीत करत आहे. त्यांच्या पनवेल येथील मेळाव्यात दिशा देखील स्पष्ट झाली आहे. त्यामुळे भाजपच्या चालींकडे देखील दुर्लक्ष करून चालणार नाही अशी प्रतिक्रिया 'एबीपी माझा'शी बोलताना दिली.


अर्थात राजकारणात काहीही होऊ शकते. हि सद्यस्थिती असली तरी आगामी काळात गणितं बदलू शकतात. पण, सध्या भाजपनं कोकणावर केंद्रीत केलेलं लक्ष देखील नजरअंदाज करून चालणार नाही. शिवाय, आशिष शेलार यांनी रत्नागिरी येथे बोलताना रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभेत कमळ फुलेल अशी केलेली घोषणा राजकीय दृष्ट्या खूप काही सांगून जाते. परिणामी येणाऱ्या काळात कोकणातील राजकीय घडामोडी मोठ्या आणि राज्याच्या राजकारणात महत्त्वाच्या असणार हे नक्की!