सिंधुदुर्ग : शिवसेनेचा शेवटचा आमदार गेला तरी मी शिवसेनेसोबत राहणार असल्याची प्रतिक्रिया शिवसेनेचे आमदार वैभव नाईक यांनी दिली आहे. शिवसेनेचे बंडखोर आमदार हे भाजपच्या नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांच्या पायाखाली गेले आहेत. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे त्याच्यासमोर झुकले नाहीत, ते तुमच्यासमोर काय झुकणार? सामान्य शिवसैनिक उद्धव ठाकरे यांच्या पाठिशी खंबीरपणे उभे आहेत. उद्धव ठाकरे यांनी अमित शाह यांना एक फोन लावला असता तरीदेखील हे सरकार वाचेल. मात्र शिवसेना आणि उद्धव ठाकरे कोणासमोर झुकणार नाहीत, असंही वैभव नाईक म्हणाले. "जे दीपक केसरकर संजय राऊत यांचा राजीनामा मागत आहेत, त्या केसरकरांनी आधी राजीनामा द्यावा. केसरकर यांनी संजय राऊत यांना मतदान केलं नव्हतं. तरी देखील शिवसेना सोडून गेलेले आमदार आहेत त्यांनी राजीनामा द्यावा मग संजय राऊत यांचा राजीनामा देऊन आम्ही निवडून सुद्धा आणू," आमदार वैभव नाईक म्हणाले.


मंत्रिपदाच्या गाजरासाठी आमदारांची बंडखोरी : वैभव नाईक
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शिवसेनेचे बंडखोर आमदार दीपक केसरकर यांनी बंड केलं तरीदेखील सावंतवाडी मतदारसंघातील जनता शिवसेनेसोबत आहे हे दाखवण्यासाठी सावंतवाडीत रॅली काढण्यात आली आहे. भाजपने पैशांच्या जीवावर आमदार फोडले असून भाजप मदमस्त झाली आहे. दीपक केसरकर त्यांचे प्रवक्ते सांगतात उद्धवजी आणि भाजप यांना एकत्रित करण्यासाठी हे करतो. मात्र उद्धवजी एका फोनवर एकत्र येऊ शकतात. पण महाराष्ट्राचा सह्याद्री कोणासमोर झुकणार नाही ही उद्धवजी यांची भूमिका आहे. दीपक केसरकर येण्याच्या आधीपासूनच सावंतवाडी मतदारसंघ शिवसेनेचा आहे. उदय सामंत यांना आम्ही बाजूला राहून प्रतिष्ठा देण्याचं काम केलं. मात्र या मंडळींनी मंत्रिपदाच्या गाजरासाठी बंडखोरी केली आहे. बंडखोरी करुन गेलेल्या आमदारांवर गद्दारीचा डाग पुसणार नाही, तसेच त्यांची निष्ठा राहणार नाही, असं वैभव नाईक म्हणाले. 



नारायण राणे यांनी शिवसेना सोडली तेव्हा जिल्ह्यात झेंडा रोवण्यासाठी कार्यकर्ते नव्हते. मात्र त्याच नारायण राणेंना गाडण्याचं काम कोकणातील जनतेने केलं. कोकणातील जनतेने ज्या शिवसेनेला वाढवलं, ती शिवसेना कधीही संपणार नाही. हे आमदार गेले तरी नवीन आमदार तयार होतील, मात्र शिवसेना कोणासमोर झुकणार नाही. बंडखोर आमदार एक एक करुन जात आहेत ते डील करुन जात आहेत. यामागे भाजप असल्याचा आरोप आमदार वैभव नाईक यांनी केला आहे. जर उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली तर त्यांना त्याच भाषेत उत्तर दिले जाईल. नारायण राणेंच्या भाजपचं अस्तित्व संपलेलं आहे. नितेश राणे मंत्री होतील यासाठी ते कसरत करत आहेत. त्यामुळे अशा लोकांना मंत्रिपद मिळणार नाहीत. दीपक केसरकर यांची एवढी ताकद नाही की आम्ही त्यांच्याशी राजकीय संघर्ष करु शकतील, अशी टीका वैभव नाईक यांनी केली आहे. 


50 लोकांचं शक्तिप्रदर्शन बघितलं, वैभव नाईकांच्या रॅलीवर निलेश राणेंचा टोला
दरम्यान वैभव नाईक यांच्या रॅलीवर निलेश राणे यांनी टीका केली आहे. 50 लोकांचं शक्तिप्रदर्शन बघितलं. इथून तिथून भाड्याने आणलेले लोक आहेत. वैभव नाईक यांच्या शक्तिप्रदर्शनामध्ये 50 ते 60 लोक येत नाहीत. या लोकांना वडापाव आणून उभे करतात. गच्चीवरुन फोटो काढला तर 50 लोक दिसतात, असं भाजप नेते निलेश राणे म्हणाले.