सिंधुदुर्ग : "दीपक केसरकर यांना अजून सुरक्षा हवी असल्यास माझी सुरक्षा कमी करा आणि त्यांना पुरवा. पण शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करताना भान ठेवून टीका करावी," असं शिवसेनेचे कुडाळ मतदारसंघाचे जायंट किलर आमदार वैभव नाईक यांनी म्हटलं आहे. दीपक केसरकर यांना अधिकची सुरक्षा पुरवण्यासाठी मी स्वत: गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांना पत्र लिहिलं आहे, असंही वैभव नाईक यांनी सांगितलं.


राजकीय आकसापोटी शिवसेनेच्या आमदारांचे संरक्षण मुख्यमंत्री आणि गृहमंत्री यांच्या आदेशाने काढून घेण्यात आले आहे, असा आरोप एकनाथ शिंदे यांनी ट्वीटद्वारे केला. या आमदारांच्या कुटुंबियांच्या संरक्षणाची जबाबदारी राज्य सरकारची असल्याचेही त्यांनी सांगितलं. या आमदारांच्या कुटुंबीयांना धमकावण्याचा प्रयत्न होत आहे. या आमदारांच्या कुटुंबियांना काही झाल्यास त्याची जबाबदारी ही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, शरद पवार, आदित्य ठाकरे आणि संजय राऊत जबाबदार असतील असंही शिंदे यांनी म्हटलं. आमदारांच्या कुटुंबियांच्या सुरक्षेबाबत एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, गृहमंत्री दिलीप वळसे पाटील, पोलीस महासंचालक रजनीश सेठ यांच्यासह राज्यातील पोलीस आयुक्तांना हे पत्र लिहिलं होतं.


अडीच वर्षे सत्तेत असताना केसरकरांना दहशत दिसली नाही? : वैभव नाईक 
एकनाथ शिंदे यांनी लिहिलेल्या या पत्रात सुरक्षा काढलेल्या आमदारांच्या यादीत सिंधुदुर्गचे आमदार दीपक केसरकर यांचाही समावेश आहे. यावर आमदार वैव नाईक यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले की, "आमदार दीपक केसरकर नेहमी पक्षांतर करताना दहशतीचा मुद्दा समोर आणतात. याआधी जेव्हा ते शिवसेनेत आले तेव्हा राणेंची दहशत म्हणून ओरडत होते आणि आता शिंदे गटात सामील झाल्यानंतर पुन्हा दहशतीचा हा मुद्दा आणत आहेत. मुळात सिंधुदुर्गात शिवसेनेपासून त्यांना कोणत्याही प्रकारचा धोका नाही. मात्र पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करताना त्यांनी भान ठेवून टीका करावी. दीपक केसरकर यांना अधिकची सुरक्षा पुरवण्यासाठी मी स्वतः गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांना पत्र लिहिलं आहे. अजून सुरक्षा त्यांना हवी असल्यास माझी सुरक्षा कमी करा आणि त्यांना पुरवा." "दीपक केसरकर यांना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी गृहराज्यमंत्री केलं त्यावेळी दहशत कुठे गेली होती?", असाही प्रश्न आमदार वैभव नाईक यांनी उपस्थित केला. "गेली अडीच वर्षे सत्तेत असताना दीपक केसरकरांना दहशत दिसली नाही का?" असंही ते म्हणाले.


बंडखोर आमदारांच्या कुटुंबियांना संरक्षण देण्याचे पोलिसांना आदेश : गृहमंत्री
राज्यातील शिवसैनिकांची वाढती नाराजी आणि त्यांच्या कार्यालयाची होणारी तोडफोड पाहता कुटुंबांला संरक्षण देण्याचा निर्णय गृह विभागाने घेतला आहे. बंडखोर आमदारांच्या कुटुंबियांना संरक्षण देण्याचे आदेश गृह विभागाने पोलिसांना दिले आहेत. "विधानसभा सदस्य किंवा खासदार यांना सुरक्षा स्थानिक पातळीवर असते. ती सुरक्षा जिल्हा किंवा राज्यापुरती असते. त्यामुळे कोणाची सुरक्षा काढली नाही उलट त्यांच्या कुटुंबाला आम्ही सुरक्षा दिली आहे. पोलीस दल अलर्ट आहे. कायदा आणि सुव्यवस्था राखावी याबाबात मी आदेश दिले आहेत," असं गृहमंत्री दिलीप वळसे पाटील म्हणाले.