Holi 2023 : कोकणात सणउत्सवांचा मोठा भरणा आहे. कोकणात गणेशोत्सवानंतर सर्वात मोठा सण म्हणजेच होळीचा सण होय. होळी अर्थात शिगमोत्सवाला मोठ्या संख्येने चाकरमानी देखील गावागावात दाखल होत असतात. सिंधुदुर्ग जिल्ह्यात होळी सणाच्या वेगवेगळ्या रूढी, परंपरा पाहायला मिळतात. जिल्ह्यात ज्या पद्धतीने गणेशोत्सव दीड, पाच, सात, नऊ, अकरा आणि पंधरा दिवस साजरा केला जातो. तसाच होळीचा सण देखील साजरा केला जातो. सिंधुदुर्ग जिल्ह्यात शिमगोत्सवात काही ठिकाणी पालखी नाचवली जाते तर काही ठिकाणी खेळ नाचवले जातात. काही ठिकाणी राधा नाचवली जाते. तर गावागावात रोंबाट साजर केल जात.


जिल्ह्यातील महत्वाचे शिमगोत्सव


होळीच्या तिसऱ्या दिवशी म्हणजेच उद्या होणार कुडाळ तालक्यातील नेरूर गावचा मांड उत्सव. माड़ उत्सव हा स्थानिकाच्या कलेला एक अविष्कार आहे. गावच रोंबाट ढोलताशांच्या गजरात श्री देव कलेश्वराच्या भेटीस येते. याला गोडा रोंबाट असं म्हटलं जातं. त्यानंतर हे रोबाट सायचे टेब येथे आल्यावर या ठिकाणी गारांही मांडली जातात. आणि त्यानंतर सुरु होतो तो मांड उत्सव. अक्राळ विक्राळ देखावे, विविध प्रकारचे सोंगाडे मेस्त्री कुटुंबीय आपल्या कल्पनेने तयार करुन या मांडावर सादरीकरण करतात. पौराणिक कथावर आधारीत हे देखावे सादर करतात. गणपती, राधा, राक्षस, वाघ, हंस, पशुपक्षी अशी अनेकजण वेशभूषा घालून नृत्य करतात. यात लहान मुलांचा सहभाग असतो. 


देवगड तालुक्यातील पुरळचा "कापडखेळ"


देवगड तालुक्यातील पुरळ गावात होणारा कापडखेळ हा शिवकाळापासून प्रसिद्ध आहे. कित्येक वर्षापासून शिमगोत्सवामध्ये पुरळच्या निशाणासोबत पुरळचे ग्रामस्थ गावामध्ये आपला कापडखेळ सादर करतात. या कापडखेळाचे वैशिष्टय म्हणजे इतिहासकालीन जसे शिवरायांच्या मावळ्यांनी परिधान केलेले फेटे असतात, त्याचप्रमाणे पुरळ गावातील कापड खेळ्यांचे हे फेट सुबकतेने सजविले जातात. यामुळे या खेळ्यांच्या फेट्यांची कलाकृती ही लक्षणीय असते. अंगामध्ये शर्ट व कमरेभोवती गोल साड्या परिधान करून हातात काठ्या, रुमाल घेऊन फेर धरून हा धार्मिक खेळ सादर केला जातो. 


'कापडखेळ' हे देवखेळे (कापडखेळे) परगावातील नवस पुरळ गावात जाऊन शिमगोत्सवामध्ये हे देवखेळे त्या नवस असणा-या व्यक्तीच्या घरासमोर निशाणकाठी घेऊन त्या ठिकाणी देवखेच्च्यांचा खेळ सादर केला जातो. नवसाला पावणारे हे देवखेळे म्हणून प्रसिद्ध आहेत. पुरळ गावातील पावणाई, रवळनाथ मंदिरातील निशाणकाठी व देवतरंग पुरळ मधीलच गावराई चव्हाट्यावर शिमगोत्सव कालावधीत स्थलांतरीत केले जातात. आणि याचं ठिकाणी 'देवखेळे (कापडखेळे) हे पुरळ गावात खेळले जातात. 


कुणकेरीचा प्रसिद्ध हुडोत्सव


सावंतवाडी तालुक्यातील कुणकेरी गावच्या हुडोत्सवाने आपल्या वैशिष्ट्यपूर्ण अशा प्रथा परंपरांमुळे वेगळपण जपले आहे. दरवर्षी भाविकांच्या अलोट गर्दीत साजरा होणारा 'हुडोत्सव सर्वांसाठी पर्वणीच असते. हा हुडा सागवानी लाकडाचा बनविण्यात आला. गावात डफ व घुमट वाद्यांचा वापर करून गावात खेळ खेळले जातात. हे खेळगडी जी गाणी म्हणतात त्यांना जती म्हणतात. घोडेमोडणी आणि वाघाची शिकार हे या हुडोत्सवाचे वेगळेपण आहे. कोलगांव, कुणकेरी, आंबेगावचं रोंबाट होळीच्या सातव्या दिवशी श्रीदेवी भावई, आवेगावचा श्रीदेव क्षेत्रपाल, कोलगांवचा श्रीदेव कलेश्वर हुडोत्सवात सहभागी होतात.


होळीच्या सहाव्या दिवशी रात्री हुड्यावर व होळीवर पेटत्या शेणी मारल्या जातात. होळीच्या सातव्या दिवशी मुख्य हुडोत्सव असतो. तीन अवसार या हुड्यावर चढतात, यावेळी खाली जमलेल्या भक्तगणांच्या अफाट गर्दीतून या अवसारावर दगड मारण्याची प्रथा आहे. कुणकेरीतील परबवाडी येथे श्री भावई देवघरी तिची उत्सवमूर्ती आहे. हुडोत्सवाच्या दिवशी याठिकाणी तसेच भावईच्या मंदिरातही नवस करणे, नवस फेडणे, ओटी भरणे होतात.


वेंगुर्ला- मठ येथील घोडेमोडणी


वेंगुर्ला तालुक्यातील मठ गावात शिमगोत्सवात चालणारी अनोखी 'घोडेमोडणी' पूर्वीच्या युद्धाची प्रचिती करुन देते. शिवछत्रपती शिवाजी महाराजांनी ज्याप्रमाणे गनिमी काव्याने युद्धात विजय मिळविला, त्याप्रमाणे त्याचे एक प्रतिक म्हणून घोडेस्वारी युद्ध आणि ऐतिहासिकता, एकतेचे प्रतिक यांची जपणूक करणारा आगळावेगळा, सांस्कृतिक परंपरा जपणारा म्हणून मठ शिमगोत्सवाकडे पाहिले जाते.


पाचव्या दिवशी गावचे मानकरी घोडेस्वारी करण्यासाठी निघतात. प्रतिकात्मक घोड्याचे मुख असलेला व शेती वापरली जाणारी इरली' याचा वापर करून, सजवून, गुलाल, रंग, ढोलताशांच्या गजरात आपल्या ठिकाणावरून स्वारीसाठी निघतात. ज्याप्रमाणे मराठ्यांनी गनिमीकाव्याने युद्धस्वारी करून युद्ध जिंकले व विजयोत्सव साजरा केला त्याचेच प्रतिकात्मक घोडेस्वारी लढाई होते. हे दृश्य पाहताना कधी रात्र होते हे समजतही नाही. एवढी ही घोडेमोडणी प्रभावी असते. त्यानंतर बनाटे फिरविण्यासारखी चित्तथरारक नृत्ये साजरी होतात.