Sindhudurg News Update : स्ट्रॉबेरी ( Strawberry ) म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर येतं ते महाबळेश्र्वर. मात्र, तळकोकणात देखील आता स्ट्रॉबेरीची शेती बहरत आहे. तळकोकणच्या लाल मातीत स्ट्रॉबेरी लागवडीचा प्रयोग यशस्वी केला आहे. गेल्या तीन वर्षांपासून सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडी तालुक्यातील सह्याद्रीच्या पायथ्याशी घारपी गावात स्ट्रॉबेरीचं उत्पादन घेतलं जांत आहे.
सावंतवाडीतील घारपी गावातील जोश कर्णाई या प्रयोगशील शेतकऱ्याने लाल मातीत स्ट्रॉबेरीची शेती केली आहे. मूळचे केरळ मधील कर्णाई हे कामानिमित्त मुंबईत आले होते. मुंबईत स्थायिक झाल्यानंतर त्यांनी तळकोकणात शेती घेतली. या शेतीत ते अनेक वेगवेगळे प्रयोग करत आहेत. त्यात त्यांनी सध्या स्ट्रॉबेरीचं उत्पादन घेतलं आहे.
जोश कर्णाई हे अर्धा एकर जागेवर गेली तीन वर्ष स्ट्रॉबेरीचं उत्पन्न घेत आहेत. दिवसाआड त्यांना 25 किलो उत्पन्न मिळतं. सुरुवातीला त्यांना 700 रुपये प्रति किलो दर मिळाला. सध्या हा दर 250 रुपये आहे. स्थानिक सावंतवाडी बाजारपेठेसह गोवा राज्यात मोठ्या प्रमाणात स्ट्रॉबेरीला मागणी आहे.
कोकणातील उष्ण आणि दमट वातावरणात स्ट्रॉबेरीची शेती शक्य झाली आहे. घारपी गावातील वातावरण स्ट्रॉबेरी शेतीसाठी पूरक आहे. हनुमंत गडाच्या अगदी पायथ्याशी स्ट्रॉबेरीची ही शेती असल्याने पर्यटक देखील या स्ट्रॉबेरीच्या शेतीला भेट देत स्ट्रॉबेरीची चव चाखतात.
कोकणात भातपिकांसह आंबा, काजू, केळी, नारळाच्या बागायतीचं पीक घेतलं जातं. मात्र आता महाबळेश्वरमध्ये केली जाणारी स्ट्रॉबेरीची शेती तळकोकणात देखील फुलवली जात आहे. सेंद्रिय पद्धतीने स्ट्रॉबेरी शेती केली जाते. त्यामुळे या स्ट्रॉबेरीला चव देखील चांगली आहे. अवघ्या सहा महिन्याच्या कालावधीचं हे स्ट्रॉबेरीच उत्पादन घेतलं जात अल्याची माहिती शेतकरी जोश कर्णाई यांनी दिली.
Strawberry : स्ट्रॉबेरीतून लाखो रुपयांचं उत्पन्न
स्ट्रॉबेरीतून शेतकऱ्यांना लाखो रुपयांचे उत्पन्न मिळते. त्यामुळे स्ट्रॉबेरीची शेती शेतकऱ्यांना मालामाल करत आहे. महाबळेश्वरमध्ये स्टॉबेरीसाठी पोषक वातावरण असल्याने तेथे मोठ्या प्रमाणात स्टॉबेरीची शेती केली जाते. प्रामुख्याने पर्वतीय आणि थंड हवेच्या ठिकाणी स्ट्रॉबेरीची शेती केली जाते. तिथल्या पोषक वातावरणामुळे स्ट्रॉबेरीचे उत्पन्नही शेतकऱ्यांना चांगले मिळते. परंतु, गेल्या काही वर्षांपासून आता राज्यभरातील अनेक भागांमध्ये शेतकरी स्टॉबेरीची शेती करत आहेत. राज्यभरातील शेतकरी आता स्ट्रॉबेरी शेतीकडे वळताना दिसू लागला आहे. अनेक शेतकऱ्यांनी स्टॉबेरी शेतीचा यशस्वी प्रयोग केलाय.
महत्वाच्या बातम्या