मुंबई : महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे 6 जून ला सिंधुदुर्ग दौऱ्यावर आहेत. यावेळी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सावंतवाडी येथे संत गाडगेबाबा मंडई आणि इतर भूमिपूजनाचा कार्यक्रम संपन्न होणार आहे. त्यानंतर कुडाळमध्ये शासन आपल्या दारी योजनेचा शुभारंभ मुख्यमंत्र्यांच्या हस्ते होणार आहे. याच पार्श्वभूमीवर उद्योग मंत्री उदय सामंत आणि शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी पाहणी केली.मात्र हा कार्यक्रम सावंतवाडी मतदारसंघात नियोजित असताना केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या आग्रहामुळे कुडाळ येथे घेण्याचे नियोजन करण्यात आला. यावरूनच आता भाजप आणि शिवसेनेमधील अंतर्गत गटबाजी समोर येत आहे.
दिपक केसरकर यांनी आपल्या सावंतवाडी मतदारसंघात या कार्यक्रमाचे पूर्ण नियोजन केले होते. मात्र केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी हा कार्यक्रम कुडाळ मतदारसंघात घेण्याच्या सूचना केल्यामुळे या कार्यक्रमाची जागा ऐनवेळी बदलण्यात आली आहे. यावरूनच आता ठाकरे गटाचे आमदार वैभव नाईक यांनी टीका केली आहे. भाजप पुढे शिंदेगट नमला त्यामुळेच दिपक केसरकर यांचा विरोध डावलून नारायण राणेंनी आपल्या मुलाला पुढे आणण्यासाठी दिपक केसरकर यांना शह दिल्याची टीका वैभव नाईक यांनी केली.
शिंदे-फडणवीस सरकारमध्ये भाजपचा शब्द अंतिम
दिपक केसरकर यांनी यावर सारवासारव करताना नारायण राणे हे ज्येष्ठ मंत्री आहेत त्यांची इच्छा असेल तर जरूर आपण हा कुडाळला कार्यक्रम घेऊ. मात्र दोन कार्यक्रम घेण्याऐवजी एकच कार्यक्रम घेऊ त्यामुळे आपली एकी दिसेल अशी सारवासारव दिपक केसरकर यांनी केली आहे. त्यामुळेच शिंदे-फडणवीस सरकारमध्ये भाजपचा शब्द अंतिम असल्याचं दिसून येतय.
आमदारांना ताकद देण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी कंबर कसली
सिंधुदुर्ग जिल्ह्यात कुडाळ येथे शासन आपल्या दारी या अभियानाचा जिल्हास्तरीय प्रारंभ करण्याच्या दृष्टीने सध्या जोरदार हालचाली सुरू आहेत. राज्यात मुख्यमंत्री शिंदेंबरोबर ठाकरे सोडून गेलेले आमदार ज्या-ज्या ठिकाणी होते त्या ठिकाणी या अभियानाचा शुभारंभ करण्यात आला. राजकीय बंडानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबरोबर आलेल्या आमदारांना ताकद देण्यासाठी आता मुख्यमंत्र्यांनी कंबर कसली आहे.
वैभव नाईक यांना शह देण्याकरता कुडाळमध्ये
शिंदे गटाचे आमदार आणि शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्या मतदारसंघातील 'शासन आपल्या दारी' या नियोजित जिल्हास्तरीय अभियानाच्या शुभारंभाचा कार्यक्रम राणेंनी आपले राजकीय वजन वापरून आमदार वैभव नाईक यांना शह देण्याकरता कुडाळमध्ये घेतल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.