Rare Snake In Sindhudurg: कुडाळ तालुक्यातील (Kudal) नारुर गावातील रांगणागड येथे दुर्मिळ आणि बिनविषारी जातीचा शेवाळी पाणसाप आढळून आला आहे. रांगणागड (Rangnagad) हे समुद्रसपाटीपासून जवळपास 679 मीटर उंचीवर आहे. पश्चिम घाटात सापडणाऱ्या बऱ्याच सापांच्या (snake) जाती ह्या रांगणागड परिसरात तसेच पायथ्याला असलेल्या नारूर गावात आढळून येतात, त्यात अजून एक दुर्मिळ बिनविषारी साप ऑलिव्ह फॉरेस्ट स्नेक (रॅबडॉप्स एक्वाटिकस) म्हणजेच शेवाळी पाणसापाची समुद्री सपाटी पासुन 217 मीटर उंचीवर  संशोधकांमार्फत प्रथमच नोंद करण्यात आली आहे. 


प्राणी मित्र अनिल गावडे, वन्यजीव अभ्यासक गौतम कदम, वैभव अमृस्कर , दिवाकर बांबार्डेकर, प्रसाद गावडे, ओमकार गावडे, शुभम फाटक यांना बुधवार रात्री ट्रेकिंग दरम्यान हा दुर्मिळ साप आढळून आला. 


शेवाळी पाणसाप हा मध्यम आकाराचा असून हा साप समुद्र सपाटी पासुन 750 ते 1000 मीटर उंचीवर सापडतो. हा साप जवळपास 94 सेमीपर्यंत वाढू शकतो. या सापाचे शरीर मध्यम-बारीक आणि समान चमकदार खवल्यांनी आच्छादलेले असते. डोके मानेपेक्षा किंचित वेगळे तर डोळे मध्यम आकाराचे असतात. पृष्ठभागाचा रंग  हिरवा, तपकिरी, शेवाळी असतो. मुख्यत्वे हा साप पाण्याच्या ठिकाणी आढळून येतो म्हणूनच याला शेवाळी पाणसाप असे म्हटले जाते. 


या सापाच्या संपूर्ण शरीरावर दोन्ही बाजूला काळ्या रंगाच्या ठिपक्यांची रांग असते. पोट आणि शेपटीकडील खवल्यांना मध्यभागी काळ्या रंगाच्या विस्तृत पट्ट्या असतात. हा साप हा निशाचर आणि जलचर साप आहे. तसेच हा साप पठार, सदाहरित जंगलांच्या मध्यम उंचीच्या पाण्याच्या प्रवाहात आढळतो. 


मासे, बेडूक आणि कृमी हे त्याचे प्रमुख भक्ष्य आहेत. हा साप अंडप्रजक असून शांत आणि लाजाळू स्वभावाचा असतो. त्याच्या भक्ष्याव्यतिरिक्त इतर कोणत्याही प्राण्यांवर तो सहजासहजी हल्ला करत नाही.
     
याआधी चुकुन  Rhabdops olivaceus असे ओळखले गेले होते. आंबोली मधून सर्वप्रथम ह्या सापाचा शोध लागला. संशोधकांनी त्याला पाण्यात रहाणार साप म्हणून एक्वाटिकस असे नामकरण केले. आंबोली येथूनही ह्या सापाची प्रथमच नोंद करण्यात आली होती आणि आता यात रांगणागडाची अधिक भर पडली आहे. पश्चिम घाटात असे बऱ्याच प्रकारचे दुर्मिळ साप, बेडूक, पाली इत्यादी प्राण्यांचे वास्तव्य आहे. या प्राण्यांचा अभ्यास करून ह्यांचे संवर्धन करणे फार गरजेचे आहे.अस अभ्यासकांना वाटत आहे. 


इतर संबंधित बातम्या: