Agriculture News : सिंधुदुर्ग (Sindhudurg) जिल्ह्यातील तिलारी खोऱ्यात हत्तींनी (elephants) धूमाकूळ घातला आहे. हत्तींनी बागायती शेतीचं मोठं नुकसान केलं आहे. त्यामुळं तळकोकणातील शेतकरी चिंतेत आहेत. तिलारी खोऱ्यातील मोर्ले गावात रात्री हत्तींनी उपद्रव केला आहे. हत्तींनी माडाची झाडं मुळासकट उपटून टाकली आहेत. तर केळीच्या बागांचं देखील मोठं नुकसान केलं आहे.
पाळये, मोर्ले परिसरात हत्तींनी ठोकला तळ
तिलारी खोऱ्यातील शेतकरी सातत्यानं संकटात सापडत आहे. कारण या भागात हत्तींनी धुमाकूळ घातलाय. हत्ती मोठ्या प्रमाणात बागायती शेतीचं नुकसान करत आहेत. याचा मोठा आर्थिक फटका शेतकऱ्यांना बसत आहे. हत्ती पाळये, मोर्ले परिसरात आपला तळ ठोकून आहेत. गेल्याच आठवड्यात पाळये गावातील शेतकऱ्यांच्या सुपारी, केळी या बागायती शेतीमध्ये धुडगूस घालत मोठे नुकसान केले होते. रात्री हे हत्ती मोर्ले येथे दाखल झाले आहेत. हत्तींनी शेतकऱ्यांच्या केळींचा फडशा पाडला आहे. माडाची झाडे उपटून टाकले आहे. याबाबत वन विभागाने तातडीने उपाययोजना करावी अशी मागणी शेतकरी करत आहेत.
शेतकऱ्यांची नुकसान भरपाई देण्याची मागणी
2001 पासून हत्ती सिंधुदुर्ग जिल्ह्यात दाखल झाले. मात्र पावसाळ्यात हत्ती जिल्ह्यात न राहता कर्नाटकमध्ये निघून जायचे. मात्र, मागील काही वर्षापासून हत्ती कर्नाटकमध्ये न जाता तिलारी खोऱ्यात ठाण मांडून बसत आहेत. इथल्या भातशेतीसह नारळ, सुपारी, काजू, केळी, माड या बागांचं मोठ्या प्रमाणात नुकसान करत आहेत. त्यामुळं इथले शेतकरी चिंतेत आहेत. हत्तीबाधित गावातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना वाढीव स्वरुपात नुकसान भरपाई कशी देता येईल याचाही विचार करावा अशी मागणी शेतकरी करत आहेत. कर्नाटकातील रानटी हत्ती हे दोडामार्ग तालुक्यातील केवळ मांगेली येथूनच नव्हे तर कोल्हापूर जिल्ह्यातील आजरा, चंदगड मार्गे देखील सिंधुदुर्गात येतात.
हत्तींचा बंदोबस्त करण्याची शेतकऱ्यांची मागणी
महाराष्ट्र, कर्नाटक, गोवा या तिन्ही राज्यांच्या सीमेवर वसलेलं तळकोकणातील दोडामार्ग मधील तिलारीच्या खोऱ्यात गेली वीस वर्ष हत्तीचं वास्तव्य असून शेती आणि बागायतींचं नुकसान करत आहेत. पावसाळा सुरु झाला की हे हत्ती घाटमाथ्यावर जातात आणि पुन्हा पावसाळा संपल्यानंतर परत येतात. पाच ते सहा हत्तींचा कळप तिलारीच्या खोऱ्यात गेली वीस वर्षे वावरत आहे. त्यामुळे या ठिकाणचे ग्रामस्थ आणि शेतकऱ्यांची हत्तींचा बंदोबस्त करण्याची मागणी पुन्हा जोर धरु लागली आहे.
महत्त्वाच्या बातम्या: