Agriculture News : सध्या राज्याच्या काही भागात चांगला पाऊस (Rain) कोसळत आहे. मात्र, काही ठिकाणी अद्याप पावसाची प्रतीक्षा कायम आहे. ज्या ठिकाणी चांगला पाऊस झालाय, त्याठिकाणी शेतीकामांना वेग आला आहे. शेतकरी खरीप पिकांची लागवड करत आहेत. दरम्यान, मागील काही दिवसापासून तळकोकणातही जोरदार पाऊस सुरु आहे. त्यामुळं शेतकरी पिकांच्या लागवडीत व्यवस्त असल्याचे चित्र दिसत आहे.  




 पावसानं चांगली हजेरी लावल्यानं शेती कामांना गती


तळकोकणात चांगला पाऊस झाल्यामुळं शेतकरी पिकांची लागवड करत आहेत. अनेक ठिकाणी भात लागवडीला सुरुवात झाली आहे. सध्याचा पाऊस हा शेतीसाठी उपयुक्त असल्याचं शेतकऱ्यांनी म्हटलं आहे. दरम्यान, सिंधुदुर्गमध्ये (Sindhudurg) शेतकरी शेतीच्या कामात व्यस्त असतानाची काही दृश्य परेश कांबळी यांनी ड्रोनच्या माध्यमातुन टिपली आहेत. यावर्षी पावसाने चांगलीच ओढ दिली आहे. जून महिन्यात तुरळक ठिकाणं सोडली तर अन्य ठिकाणी पावसानं हजेरी लावली नाही. त्यामुळं बळीराजा चिंतेत होता. अनेक ठिकाणी शेतकऱ्यांची पेरणीची कामं खोळंबली होती. पेरणीसाठी बळीराजा पावसाची वाट बघत होता. अखेर राज्यातील काही भागात पावसानं चांगली हजेरी लावल्यानं शेती कामांना गती मिळाली आहे. दुसरीकडे अद्यापही काही भागात म्हणावा तसा पाऊस झाला नाही. त्यामुळं तेथील शेतकरी चिंतेत आहेत. अद्याप त्यांच्या पेरण्या झाल्या नाहीत. शेतकरी पावसाची वाट बघत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. 




राज्यात 20.60 लाख हेक्टरहून अधिक क्षेत्रावर पेरणी


सध्या राज्यात पावसाला सुरुवात झाली आहे. पण शेतकऱ्यांनी पेरणीची घाई करु नये. जोपर्यंत पेरणीयोग्य पाऊस पडत नाही तोपर्यंत पेरणी करु नये. पेरणीसाठी 75 ते 100 मिलीमीटर पावसाची आवश्यकता असते. त्यामुळं शेतकऱ्यांनी 75 ते 100 मिलीमीटर पाऊस झाल्याशिवाय पेरणी करु नये असा सल्ला कृषी तज्ज्ञांनी दिला आहे. मात्र, काही ठिकाणी पेरणीयोग्य पाऊस झाला आहे. त्यामुळं शेतकरी पेरणी करत आहेत. राज्यात आत्तापर्यंत 20.60 लाख हेक्टरहून अधिक क्षेत्रावर पेरणी (sowing) झाली आहे. पुढील काही दिवसांत यात आणखी भर पडण्याची अपेक्षा कृषी अधिकाऱ्यांनी व्यक्त केली. राज्यात सरासरीपेक्षा 39 टक्के कमी पाऊस पडला आहे. मात्र, या चालू जुलै महिन्यात, राज्यात उच्चांकी पाऊस होईल असा अंदाज हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला. 


आज कोकणासह विदर्भात पावसाचा ऑरेंज अलर्ट 


सध्या राज्यातील कोकण विभागात जोरदार पाऊस कोसळत आहे. त्याचबरोबर मुंबईसह उपनगर ठाणे, पालघर या जिल्ह्यातही पावसानं जोरदार हजेरी लावली आहे. तसेच पश्चिम महाराष्ट्रातील काही जिल्ह्यासह मराठवाड्यातही काही जिल्ह्यात जोरदार पाऊस झाला आहे. दरम्यान आजही कोकणासह विदर्भातील काही जिल्ह्यात पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. तर उत्तर महाराष्ट्रासह इतर विदर्भातील जिल्ह्यांमध्ये पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे. 


महत्त्वाच्या बातम्या:


Maharashtra Rain : राज्यातील काही भागात पावसाची हजेरी, आज कोकणासह विदर्भातील काही जिल्ह्यात पावसाचा ऑरेंज अलर्ट