Share Market Closing Bell: सलग तिसऱ्या दिवशी भारतीय शेअर बाजारात (Share Market) विक्रीचा सपाटा दिसून आला. बाजारातील व्यवहाराच्या आठवड्याच्या शेवटच्या दिवशी गुंतवणूकदारांनी नफा वसुली (Profit Booking) केली. नव्या वर्षातील पहिल्या पाच ट्रेडिंग सत्रापैकी तीन सत्रात बाजारात घसरण दिसून आली. शुक्रवारी शेअर बाजारातील व्यवहार थांबले तेव्हा सेन्सेक्समध्ये (Sensex) 452 अंकांची घसरण दिसून आली. तर, निफ्टी निर्देशांकात (Nifty) 132.70 अंकांची घसरण झाली. 


मुंबई शेअर बाजारात सुरू असलेल्या घसरणीचा फटका जवळपास सगळ्याच सेक्टरला बसला. आज दिवसभरातील व्यवहार थांबले तेव्हा, मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स (BSE Sensex) 452.90 अंकांच्या घसरणीसह  59,900.37 अंकांवर स्थिरावला. तर, राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टी (NSE Nifty) 132.70 अंकांच्या घसरणीसह 17,859.45 अंकांवर बंद झाला. सेन्सेक्स निर्देशांकातील 30 पैकी 5 कंपन्यांचे शेअर दर वधारले. तर, निफ्टी 50 मधील 11 कंपन्यांचे शेअर दर वधारले. तर, 39 कंपन्यांच्या शेअर दरात घसरण दिसून आली. आज बाजारात व्यवहार झालेल्या कंपन्यांपैकी 1392 कंपन्यांचे शेअर दर वधारले होते. तर, 2007 कंपन्यांचे शेअर दर घसरले. 128 कंपन्यांच्या शेअर दरात कोणताही बदल झाला नाही. 


कोणत्या सेक्टरमध्ये तेजी?


शेअर बाजारात एफएमसीजी, ऑइल अॅण्ड गॅस, ग्राहकोपयोगी वस्तू आणि एनर्जी या सेक्टरमधील शेअर वगळता इतर सर्व सेक्टरमध्ये घसरण दिसून आली. बँकिंग, ऑटो, आयटी, फार्मा, मेटल्स, मीडिया, इन्फ्रा सेक्टरमध्ये विक्रीचा जोर दिसून आला. मिडकॅप आणि स्मॉलकॅप सेक्टरकमध्येही घसरण दिसून आली.  


या शेअर्समध्ये तेजी आणि घसरण


शेअर बाजारात  महिंद्रा अॅण्ड महिंद्रामध्ये 1.07 टक्के, रिलायन्समध्ये 0.94 टक्के, नेस्लेमध्ये 0.57 टक्क्यांची तेजी दिसून आली. त्याशिवाय, आयटीसी 0.40 टक्के, लार्सन अॅण्ड ट्रुबोमध्ये 0.23 टक्क्यांच्या तेजीसह बंद झाले. तर, टीसीएसमध्ये 2.97 टक्के, इंडसइंड बँक 2.81 टक्के, बजाज फिनसर्व्हमध्ये 2.63 टक्क्यांची घसरण दिसून आली. टेक महिंद्रांच्या शेअर दरात 2.40 टक्के आणि बजाज फायनान्समध्ये 1.95 टक्क्यांची घसरण दिसून आली. 


गुंतवणूकदारांचे 2.20 लाख कोटींचे नुकसान


शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदारांचे आज मोठे नुकसान झाले. बीसएसईमध्ये सूचीबद्ध असलेल्या कंपन्यांचे बाजार भांडवल आज  279.81 लाख कोटी इतके झाले. आज बाजार भांडवलात 2.20 लाख कोटींचे नुकसान झाले.