SBI Rate Hike : देशातील सर्वात मोठी बँक SBI (स्टेट बँक ऑफ इंडिया) ने आजपासून व्याजदरात वाढ केली आहे. यावेळी बँकेने बेस रेट (SBI Base Rate Hike) आणि बेंचमार्क प्राइम लेंडिंग रेट (SBI BPLR Hike) वाढवले आहेत. स्टेट बँक ऑफ इंडिया या दोन्ही दरांमध्ये तिमाही आधारावर सुधारणा करते.
BPLR मध्ये वाढ
स्टेट बँक ऑफ इंडियाच्या वेबसाइटवर उपलब्ध माहितीनुसार, दोन्ही नवे दर आजपासून, बुधवारपासून लागू झाले आहेत. बँकेने बेंचमार्क प्राइम लेंडिंग रेटमध्ये 70 बेसिस पॉइंट्स म्हणजेच 0.70 टक्क्यांची वाढ केली आहे. आता त्याचा नवीन दर 14.85 टक्के झाला आहे. यापूर्वी, डिसेंबर 2022 मध्ये बीपीएलआर बदलण्यात आला होता. तेव्हापासून आतापर्यंत हा दर 14.15 टक्के होता. हा दर वाढल्यानंतर बीपीएलआरशी संबंधित कर्जाचे हप्तेही वाढणार आहेत.
मूळ दरात वाढ
बीपीएलआरसोबतच बँकेने बेस रेटमध्येही वाढ केली आहे. याचा अर्थ ज्या ग्राहकांनी एसबीआयकडून बेस रेटवर कर्ज घेतले आहे, त्यांचा ईएमआयही वाढणार आहे. त्यामुळे महागाईचे चटके सोसणाऱ्या ग्राहकांना आणखी झळ सोसावी लागणार आहे.
या दरांवर कर्ज उपलब्ध
बीपीएलआर आणि बेस रेट हे बँकांचे जुने बेंचमार्क आहेत. या बेंचमार्कच्या आधारे कर्ज दिले गेले. आता बहुतेक बँका एक्सटर्नल बेंचमार्क बेस्ड लेंडिंग रेट म्हणजेच EBLR किंवा रेपो लिंक्ड लेंडिंग रेट म्हणजेच RLLR वर कर्ज देतात.
वर्ष 2016 च्या आधी घेतलेल्या कर्जाच्या ईएमआयमध्ये देखील वाढ होणार आहे. बेस रेट हा किमान व्याजदर, ज्यावर बँका कर्ज देतात. यापेक्षा कमी दराने कर्ज देता येत नाही. एसबीआयकडून याआधीच एमसीएलआरमध्ये 0.10 टक्क्यांची वाढ करण्यात आली आहे. एसबीआयकडून या वर्षात दोनदा व्याजदरात वाढ केली गेली आहे. आरबीआयकडून मे 2022 नंतर सहाव्यांदाच रेपो रेट वाढवल्यानंतर अनेक बॅंकांची कर्ज महागली आहेत.
पुढील महिन्यात एमपीसीची बैठक
पुढील महिन्याच्या सुरुवातीला रिझर्व्ह बँकेच्या चलनविषयक धोरण समितीची बैठक (RBI MPC Meeting) होणार आहे. त्याआधीच SBI ने दोन्ही जुन्या बेंचमार्क दरांमध्ये वाढ केली आहे. असे मानले जात आहे की 6 एप्रिलपासून सुरू होणाऱ्या एमपीसीच्या बैठकीत रिझर्व्ह बँक पुन्हा 25 बेसिस पॉइंट्स म्हणजेच 0.25 टक्के रेपो रेट वाढवू शकते. खरे तर या वर्षाच्या सुरुवातीपासूनच महागाईने पुन्हा डोके वर काढण्यास सुरुवात केली आहे. यामुळे व्याज दरवाढीचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.
सर्व बँकांची कर्जे महाग
महागाई वाढत असल्यामुळे रिझर्व्ह बँकेने गेल्या वर्षी मे महिन्यापासून रेपो दरात (RBI Repo Rate Hike) वाढ करण्यास सुरुवात केली होती. तेव्हापासून आतापर्यंत अनेक टप्प्यांत रेपो दरात वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे जवळपास सर्वच बँकांनी व्याजदर वाढवले आहेत. यामुळे कर्जाचे हप्ते वाढले आहेत.