Unseasonal Rain : राज्यात ऐन उन्हाळ्यात अवकाळी पावसाने हजेरी लावल्यामुळे बळीराजा संकटात सापडला आहे. अशातच आता पुढचे 5 दिवस राज्यात मुसळधार पाऊस होणार असल्याची माहिती हवामान खात्याकडून देण्यात आली आहे. आज पाच वाजल्यापासून अनेक जिल्ह्यात पावसाला सुरुवात झाली, अचानक आलेल्या पावसामुळे नागरिकांची एकच धावपळ उडाली. कोल्हापूर, सातारा, नंदुरबारसह अनेक ठिकाणी पावसाने हजेरी लावली. तर काही जिल्ह्यात ढगाळ वातावरण होत. 


कोल्हापूर जिल्ह्यातील गारगोटी याठिकाणी मुसळधार पाऊस झाला. मुसळधार पावसामुळे गारगोटी इथल्या मार्केटमध्ये पाणीच पाणी झाले होते. यामुळे येथील व्यापाऱ्यांचं नुकसान झाले. आज संध्याकाळी 5 वाजण्याच्या सुमारास पावसाला सुरुवात झाली होती. साताऱ्यातील अनेक भागात पाऊस मुसळधार पाऊस झाला.  साताऱ्यातील वाई खंडाळा तालुक्यासह महाबळेश्वरच्या काही भागात पावसाने हजेरी लावली.  महाबळेश्वर, खंडाळा, लोणद भागासह सातारा शहरातही पाऊस झाला. संपूर्ण साताऱ्यातील विद्युत पुरवठा खंडित झाला. 


पुण्यात सायंकाळी अचानक मुसळधार पावसाला सुरुवात झाली. कोथरूड, डेक्कन, औंध, पुणे विद्यापीठ परिसरात पाऊस झाला. अचानक पाऊस आल्याने पुणेकरांची चांगलीच तारांबळ उडाली. पुण्यातील अनेक रस्त्यांवर वाहतूक कोंडी बघायला मिळाली. मुंबईतही अनेक ठिकाणी रिमझीम पाऊस झाला.


नंदुरबार जिल्ह्यात पुन्हा अवकाळी पावसाला सुरुवात झाली. नवापूर, नंदुरबार, तळोदा, धडगाव तालुक्यात वादळी वाऱ्यांसह पाऊस कोसळला. पावसामुळे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. गहू, हरभरा, रब्बी ज्वारी, केळी आणि पपईसह इतर पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. अवकाळी पावसामुळे रब्बी हंगामाच्या पिकांचे पूर्ण नुकसान होण्याची शक्यता आहे.  कर्मचारी संपावर गेल्यामुळे आधीच्या पावसात झालेल्या नुकसानीचे पंचनामे झाले नाहीत. त्यात आता आणखी एकदा अवकाळी पाऊस आला आहे, त्यामुळे शेतकऱ्यांना दुहेरी फटका बसला आहे. 


विदर्भात 4 दिवस गारांसह अतिवृष्टीचा इशारा 
नागपूर विभागात चार दिवस गारांसह अतिवृष्टीचा इशारा हवामान विभागाकडून देण्यात आला आहे. नागपूर,चंद्रपूर, गडचिरोलीत ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. शेतकऱ्यांसह सर्व नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे. भारतीय हवामान विभागाच्या माहितीनुसार  नागपूर विभागात उद्यापासून (दि.16)  19 मार्चपर्यंत  वादळी वारे, गारपीट तसेच  पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे.  16 व 17 मार्च रोजी नागपूर, चंद्रपूर व गडचिरोली या तीन जिल्हयात अतिसतर्कतेचा इशारा (ऑरेंज अलर्ट)  देण्यात आला आहे. भारतीय हवामान विभागातर्फे नागपूर विभागातील सर्व जिल्ह्यात सतर्कतेचा इशारा देण्यात आला असून नागपूर , चंद्रपूर व गडचिरोली जिल्हयांत गुरुवार, 16 मार्च व शुक्रवार, 17 मार्च रोजी अतिसतर्कतेचा इशारा (ऑरेंज अलर्ट)  देण्यात आला आहे. त्यासोबतच 16 ते 19 मार्चपर्यंत संपूर्ण विदर्भात वादळी वारे तसेच गारांसह पावसाचा इशारा (यलो अलर्ट) देण्यात आला आहे. भंडारा व गोंदिया जिल्हयात शुक्रवार 17 मार्च रोजी अतिवृष्टीची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.