Shiv Sena : सुभाष देसाईंचा मुलगा भूषण देसाई यांनी नुकताच एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला होता. आता माजी आरोग्य मंत्री दीपक सावंत यांनीही शिंदे गटात प्रवेश केला आहे. शिवसेना फुटल्यानंतर सातत्याने शिंदे गटात इनकमिंग वाढली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत दीपक सावंत यांनी पक्ष प्रवेश केला. त्याशिवाय अॅड. गुणरत्न सदावर्ते यांच्या एसटी कष्टकरी संघटनेच्या राष्ट्रीय कार्यकारणीचा किरण पावसकर यांच्या राष्ट्रीय कर्मचारी संघटनेत जाहीर प्रवेश झाला. 


म्हणून शिंदे गटात प्रवेश केला - दीपक सावंत


मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत पक्ष प्रवेश झाल्यानंतर दीपक सावंत यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला. एकनाथ शिंदे यांच्याबरोबर एकत्र काम केले आहे, त्यांच्या कामाचा उरक माहीत आहे. कोरोना काळात त्यांनी सेंटर्स उभे केले आणि काम सुरू केले. त्यांच्याबरोबर आरोग्याशी निगडित काम करता येईल म्हणून शिंदे गटात प्रवेश केला, असे दीपक सावंत म्हणाले. हार्ड फीलिंग नाही, मात्र 3 वर्षे मी घरी होतो, आपण काम करू शकतो म्हणून शिंदे गटात प्रवेश करत आहे. मला मंत्रीपद नको मला फक्त काम हवे आहे.  गेले 3 वर्षे मी काम मागत होतो. बाळासाहेब ठाकरे यांच्यामुळे मी प्रथम आमदार झालो. द टायगर पुस्तकाचे प्रकाशन केले तेव्हा मी एक पत्र उद्धव ठाकरे यांना दिले आहे.  मला घरी का बसवले त्याचे कारण अजूनही कळले नाही, असेही दीपक सावंत म्हणाले. 






मुख्यमंत्री एकनाथ शिंदे काय म्हणाले ?


माजी आरोग्य मंत्री दीपक सावंत यांचे स्वागत आणि शुभेच्छा आहे. दीपक सावंत यांनी बाळासाहेब यांच्या विचारांनी प्रेरित होऊन दुर्गम भागात काम केले. शासकीय रुग्णालयातील त्रुटी निदर्शनास आणून त्यावर उपाय त्यांनी शोधले.  सावंत हे कमी बोलणारे, प्रसिद्धीपासून दूर पण काम करणारे आहेत, असे एकनाथ शिंदे म्हणाले. 
दीपक सावंत हे बाळासाहेब यांचे कार्यकर्ते आणि डॉक्टरही होते. त्यांना कामाची आवड असताना दुर्देवाने काम थांबवावे लागले, मला त्यांनी काम करायची इच्छा व्यक्त केली म्हणून ते आजपासून आमच्यासोबत काम करतील, असेही शिंदे म्हणाले. 


आमची विकासाची गाडी सुरू आहे, पर्सनल अजेंडा नाही. लाखो लोक सोबत आहेत, मग सगळे चुकीचे आहेत का?  त्यांच्याकडे तेच तेच शब्द आहेत, नवीन काही असेल तर उत्तर देऊ असा टोला शिंदेंनी लगावला. आता तीन राज्यात निवडणुका झाल्या, त्यात कोण जिंकले तुम्हाला माहित आहे. प्रत्येक वर्गाला न्याय देण्याचे काम पंतप्रधान नरेंद्र मोदी करत आहेत. आपल्या कामामुळे लोकप्रियतेमध्ये पंतप्रधान क्रमांक एक वर आहोत. आपली अर्थाव्यवस्था दहा वरून पाचव्या स्थानावर आली, असेही शिंदे म्हणाले.