Paragliding Accident In Manali: हिमाचल प्रदेशातील कुलू-मनाली (Kullu Manali) येथे पॅराग्लायडिंग (Paragliding in Kullu-Manali) करताना पॅराशूटचा बेल्ट निसटून खाली पडल्यामुळे युवकाचा मृत्यू झाला असल्याची दुर्देवी घटना घडली आहे. या अपघातात मृत्यू झालेला युवक हा सातारा (Satara) जिल्ह्यातील शिरवळ (Shirwal) येथील आहे. सूरज शहा (Suraj Shah) असे या दुर्देवी युवकाचे नाव आहे. तो 30 वर्षांचा होता. या घटनेमुळे शिरवळ शहरावर शोककळा पसरली आहे. सूरजच्या पार्थिवावर आज अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे.


सूरज आपल्या मित्रांसह नाताळाची सुट्टी साजरी करण्यासाठी हिमाचल प्रदेशमध्ये गेला होता. सुरजचे वडील उद्योजक आहेत. सुरज मित्रांसोबत तो ख्रिसमस आणि न्यू इयर सेलिब्रेशनसाठी कुलू-मनालीला गेला होता. सुरज सुमारे 800 फुटावरून खाली पडला असल्याचे सांगण्यात येते. या अपघातानंतर सूरजसोबत असणाऱ्या त्याच्या मित्रांना मोठा धक्का बसला आहे. 


कुलू-मनाली येथील प्रेक्षणीय स्थळांसोबत पॅराग्लायडिंग हे पर्यटकांचे खास आकर्षण असते. अनेक पर्यटक खास पॅराग्लायडिंगसाठी मनालीत दाखल होतात. साहसी प्रकार असलेल्या पॅराग्लायडिंगसाठी सुरक्षेच्यादृष्टीने काही मानकेदेखील असतात. मात्र, सूरजचा अपघाती मृत्यू सेफ्टी बेल्ट निसटल्याने झाल्याने त्यावर अनेक प्रश्न उपस्थित होऊ लागले आहेत. 


पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कुलूमधील  पॅराग्लायडिंग साईट डोभी येथे हा अपघात झाला. डोभी येथील पॅराग्लायडिंग साईटवरून पायलटने उड्डाण घेतले. मात्र, थोड्याच वेळानंतर अपघात झाला. उंचावरून कोसळलेल्या आकाशचा मृतदेह सफरचंदाच्या शेतात आढळला. पायलटदेखील जखमी झाला असल्याची माहिती आहे. 


सूरज आपल्या मित्रांसह शनिवारी पॅराग्लायडिंग करण्यासाठी डोभी येथे दाखल झाले होते. डोभी येथून पॅराग्लायडिंगसाठी उड्डाण केल्यानंतर काही वेळेतच सूरजचा सेफ्टी बेल्ट खुला झाला. त्यानंतर तो खाली कोसळला. स्थानिकांनी तातडीने त्याला आणि पायलटला गंभीर जखमी अवस्थेत जवळच्या रुग्णालयात दाखल केले. त्या ठिकाणी डॉक्टरांनी सूरजला मृत घोषित केले.


अपघाताचे नेमकं कारण काय?


ग्लायडरचा पायलट शालू याने पोलिसांना सांगितले की, शर्थीचे प्रयत्न करूनही आपण सूरजला वाचवू शकलो नाही. सेफ्टी बेल्टची माहिती पर्यटकाला देण्यात आली होती, असे पायलटने सांगितले. अनेकदा सांगूनही सूरजा हात सतत सेफ्टी बेल्टवर जात होता. त्यामुळे सेफ्टी बेल्ट उघडला. सेफ्टी बेल्ट उघडल्यानंतरही पायलटने प्रयत्न करत त्याला आपल्या हाताच्या साहाय्याने वाचवण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्याचे वजन अधिक असल्याने वाचवण्यास अपयश आले असल्याचे पायलटने सांगितले. 


दरम्यान, पॅराशुट पायलटवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती मनाली पोलिसांनी दिली आहे. या घटनेचा अधिक तपास सुरू आहे.